Aditya Thackeray on Raj Thackeray: शिवसेनेसंदर्भात निवडणूक आयोगाने (Election Comission) दिलेल्या निर्णयानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) गटाला देण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. या निर्णयानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) जुन्या भाषणाचा व्हिडीओ ट्वीट करत प्रतिक्रिया नोंदवली. असं असलं तरी मागील दशभभराहून अधिक काळापासून सर्वच मराठी मनांमध्ये डोकावत राहणारा प्रश्न म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येतील का? सध्या शिवसेनेमध्ये पडलेली फूट आणि त्यानंतरच्या राजकारणादरम्यानही ही चर्चा पहायला मिळाली. हाच प्रश्न थेट उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) पुत्र आणि राज यांचे पुतणे आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) विचारण्यात आला. त्यांनी अगदी उघडपणे या प्रश्नाला रोकठोक उत्तर दिलं.
बुधवारी मुंबईत पार पडलेल्या एका वृत्तपत्राच्या पुरस्कार सोहळ्याला आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांना राज ठाकरेंसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. राज ठाकरे तुमच्यासोबत यावे असं वाटतं का? असा प्रश्न आदित्य यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य यांनी, "जे आमच्यासोबत आहेत तेच आमचं कुटुंब आहे," असं सूचक उत्तर दिलं. तसेच आदित्य यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ठाकरे कुटुंबाचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचंही सांगितलं.
फडणवीस हे राजकीय विरोधक असले तरी अजूनही ते आमचे कौटुंबिक मित्र आहेत. आमच्यावर अनेक राजकीय आरोप झाले. मात्र आम्ही उत्तरं देताना कधीच चुकीची भाषा त्यांच्याविरोधात वापरली नाही. कधीच चुकीच्या अर्थाने विधानेही केली नाहीत. आमच्यात कधीच कटुता नव्हती. आम्ही या गोष्टी पर्सनली घेत नाही, असंही आदित्य म्हणाले. फडणवीस आणि आम्ही राजकीय पटलावर विरोधक असलो तरी आमचं वैयक्तिक शत्रुत्व नाही, असं आदित्य यांनी स्पष्ट केलं.
सुप्रीम कोर्टाने आम्हाला न्याया दिल्यास सर्व गद्दार आमदार अपात्र ठरतील. ते आज ना उद्या अपात्र ठरतीलच असा विश्वास आदित्य यांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीसंदर्भात भाष्य करताना आदित्य ठाकरेंनी जे सोबत येणार त्यांना घेऊन जाणार असं सूचक विधान केलं. मात्र त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आमचे मित्रपक्ष असल्याचंही नमूद केलं.