कृष्णात पाटील, झी २४ तास, मुंबई: अरुण गवळींची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचं दिसतंय. कारण ठाकरे गटाचे सचिव आणि शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी दगडी चाळीत जाऊन गीता गवळींची भेट घेतलीय.त्यामुळे चर्चांनाही उधाण आलंय.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत गीता गवळींनी भाजपला पाठिंबा दिला होता.त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गीता गवळी यांना महापौर करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आता गीता गवळी या भायखळा विधानसभेतून विधानसभा लढण्यास इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.अरुण गवळींनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी या दोनवेळा नगरसेविका राहिल्या आहेत. गीता गवळी या मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षा देखील होत्या
लोकसभा निवडणुकीवेळी गीता गवळींनी भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र आता गणितं बदललेली आहेत.. त्यामुळे गीता गवळी या मशाल हाती घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.. सध्या भायखळा विधानसभेत शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव आहेत. त्यामुळे जर गीता गवळींना तिकीट मिळालं तर यामिनी जाधव विरुद्ध गीता गवळी अशी लढत रंगताना दिसेल..
अरुण गवळी सध्या जेलमध्ये शिक्षा भोगतोय.. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2007 मध्ये अरुण गवळीला अटक झाली.तेव्हापासून म्हणजे गेली 17 वर्ष अरुण गवळी जेलमध्ये आहे.तरीही दक्षिण मुंबईत अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळींना मानणारा मोठा वर्ग आहे. खास करुन लालबाग, परळ, करीरोड, भायखळा, दगडी चाळ, सातरस्ता, माझगाव या भागात अरुण गवळीचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे या मतांचा विचार प्रत्येक पक्षाकडून निवडणुकीत केला जातो. विधानसभा निवडणुकीतही गीता गवळींना भायखळामधून उमेदवारी देत त्याचा फायदा घेण्याची ठाकरे गटाची रणनीती असल्याची चर्चा आहे.