मुंबई : बेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत कुठलाही तोडगा निघालेला नाही. मंत्रालयात मुख्य सचिवांच्या दालनात बेस्ट संपाबद्दल बैठक पार पडली परंतु या बैठकीत कुठलाही तोडगा निघालेला नाही, अशी माहिती 'बेस्ट कृती समिती' या कामगार समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिलीय. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सलग सातवा दिवस आहे. शुक्रवारी बेस्ट कर्मचारी संपाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आज न्यायालयात याचिकेवर सुनावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचं लक्ष या सुनावणीकडे लागलं आहे. आत्तापर्यंत झालेल्या बेस्टच्या संपांपैकी हा संप सर्वात दिर्घकाळ चालणारा संप आहे.
रविवारीही मुख्य सचिव डी. के. जैन यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही. बेस्ट कर्मचारी कृती समितीच्या मागण्यांबाबत कालच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेचा तपशील मुख्य सचिव मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत. त्यानंतर समिती आपला अहवाल सोमवारी उच्च न्यायालयात सादर करणार आहे. त्यावर न्यायालय काय निर्णय देते? यावर बेस्ट संपाचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
अधिक वाचा : 'बेस्ट' संपाचा सातवा दिवस, शिवसेना पक्षप्रमुख गोंधळलेल्या अवस्थेत?
उल्लेखनीय म्हणजे, रविवारी म्हणजेच संपाच्या सहाव्या दिवशी प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊले उचलण्यात आली नाहीत. त्यामुळे आजही बेस्टचा संप सुरूच आहे. त्यामुळे तब्बल आठवडाभर प्रवाशांना आर्थिक फटका आणि मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन शासनानं संप मिटवला पाहिजे, अशा भावना प्रवाशांनी व्यक्त केल्यात.