मुंबई : भांडूपमधील फ्रेंन्ड्स सर्कल मंडळ दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने वैशिष्ट्यपूर्ण विषयावर आधारित सजावट देखावा केला जातो. या देखाव्यांमधून सामाजिक भान राखले जाते. यंदा मंडळात 'प्लेटलेट्सदान' या विषयाची माहिती देणारा अनोखा देवाखा सादर केला आहे. आतापर्यंत आपण अवयवदान, रक्तदानाबद्दल माहिती देखाव्यातून ऐकली होती. पण प्लेटलेट्सदान हा विषय सामान्यांसाठी नवीनच आहे. या विषयावर मंडळाने देखावा निर्माण करून टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमधील तज्ञांचे व्याख्यान देखील भाविकांसाठी आयोजित केले होते.
यंदा मंडळाने भाविकांना प्लेटलेट्सदान या उपक्रमाची माहिती देऊन जनजागृती केली आहे. शरीर हे साक्षात परमेश्वर आहे. या परमेश्वररूपी शरीरातून आपण इतरांना जिवंतपणीच जीवनदान देऊ शकतो. फ्रेंन्ड्स सर्कल मित्र मंडळाचे यंदाचे २४ वे वर्ष आहे. दरवर्षी सामाजिक संदेश देणारे देखावे सादर केले जातात. २०१४ रोजी मंडळाला टाटा मेमोपिअल हॉस्पिटल तर्फे व्यसनमुक्ती या विषयावर देखावा सादर केल्यामुळे पारितोषिक ही देण्यात आले होते.
मंडळातील कार्याध्यक्ष स्वप्नील कदम यांनी दिग्दर्शक, लेखक अमोल गुप्ते यांचा प्लेटलेट्सदान या विषयावरील व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिला. या व्हिडिओतून त्यांना यंदाच्या गणेशोत्सवातील सजावट देखाव्याची कल्पना सुचली. फक्त देखावा करूनच हे मंडळ थांबले नाही तर यांनी टाटा मेमोरिअल हॉस्पिटलशी संलग्न राहून प्लेटलेट्सदान हे कर्करोगासाठी सर्वश्रेष्ठ दान या विषयावर व्याख्यानमाला आयोजित केली होती. या उपक्रमाला सामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावून ३५ हून अधिक भाविकांनी यावेळी प्लेटलेट्सदान केले, अशी माहिती स्वप्नील कदम यांनी दिली.
शरिरातून रक्त काढून त्यामधील प्लेटलेट्स आणि प्लाझ्माकाढून रक्त पुन्हा शरिरात पाठवले जाते. त्यामुळे प्लेटलेट्सदान करणाऱ्या व्यक्तींच्या शरिरात पुन्हा रक्त पाठवले जाते.
टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या पुढाकाराने आणि गुणवंती जगन्नाथ कपूर फाऊंडेशन, इम्पॅक्ट फाऊंडेशन, नार्गिस दत्त चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थांच्या सहयोगाने #SaveaLife हा प्लेटलेट्सदान संदर्भात उपक्रम राबवला जातो. या उपक्रमाचा दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी एक व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. तसेच मंडळाने गुणवंती जगन्नाथ फाऊंडेशन आणि इम्पॅक्ट फाऊंडेशन च्या मदतीने व्याख्यानमाला केली.