मुंबई: उदयनराजे भोसले यांच्याकडे छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे मागणाऱ्या शिवसेनेच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेली आहे, अशी टीका करणाऱ्या भाजपवर संजय राऊत यांनी आणखी एक वार केला आहे. संजय राऊत यांनी बुधवारी रात्री ट्विट केले. भाजपने साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचा पराभव घडवून आणला, असा आरोप राऊत यांनी ट्विटमध्ये केला. त्यामुळे हादेखील शिवरायांच्या वंशजांचा अपमान ठरतो. तेव्हा आता भाजप शिवरायांच्या वंशजांची आणि महाराष्ट्राची माफी मागणार का, असा प्रतिसवाल संजय राऊत यांनी केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. छत्रपतींच्या प्रत्येक गादीविषयी आम्हाला आदर असल्याचे यावेळी राऊत यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे..छत्रपतीचया प्रत्येक गादी विषयी आम्हाला आदर आहे.
पण छत्रपती ऊदयन राजे यांचा सातारा येथे पराभव घडवून आणला..हा शिवरायाच्या वंशजांचा अपमान आहे..त्या बद्दल भाजपा शिवरायांचया वंशजांची व महाराष्ट्राची माफी मागेल काय?— Sanjay Raut (@rautsanjay61) January 15, 2020
तत्पूर्वी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत आणि शिवसेनेला चांगलेच फैलावर घेतले. श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्याचा पुरावा मागणाऱ्या संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि साताऱ्याच्या गादीचा अपमान केला आहे. भाजप या मस्तवालपणाचा निषेध करते. शिवसेनेला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही. त्यामुळे शिवसेनेने छत्रपतींचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली होती.
तसेच राज्यातील सरकार विश्वासघाताने सत्तेत आले आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांच्या डोक्यात मस्ती गेली आहे. संजय राऊत यांच्या या उद्दाम सवालाशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहमत आहेत का, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. उद्धव ठाकरे या भूमिकेशी सहमत नसतील तर त्यांनी राऊतांवर कारवाई केली पाहिजे. तरच लोकांची खात्री पटेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.