मुंबई: गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नाराजीची अखेर केंद्रीय नेतृत्वाने दखल घेतली आहे. त्यामुळे खडसे सोमवारी दुपारी आपली बाजू मांडण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत. याठिकाणी ते महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि भाजप महामंत्री बी एल संतोष यांची भेट घेणार असल्याचे समजते. याशिवाय, ते भाजपमधील अन्य ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांपूर्वीच भाजपची उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांची विभागनिहाय बैठक पार पडली होती. यावेळी खडसे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोर आपल्या मनातील खदखत व्यक्त केली होती. विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघात रोहिणी खडसे यांचा पराभव झाल्यामुळे एकनाथ खडसे पक्षावर नाराज आहेत. रोहिणी खडसे यांना पाडण्यासाठी भाजपमधीलच काहीजणांनी रसद पुरवली, असा आरोपही त्यांनी केला होता. मात्र, प्रदेशाध्यक्षांसोबतच्या बैठकीत खडसे यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता.
अपयशाची जबाबदारी नेतृत्त्वानेच घ्यायला हवी; खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
त्यामुळे बैठकीनंतरच्या पत्रकारपरिषदेत खडसे यांनी पक्षाला निर्वाणीचा इशारा दिला होता. पक्षात माझ्यावर वारंवार अन्याय होत राहिला तर मला वेगळा विचार करेल, असे त्यांनी म्हटले होते. उत्तर महाराष्ट्राची बैठक असताना मला केवळ जळगाव जिल्ह्याच्या बैठकीपुरतेच बोलवण्यात आले. अशाप्रकारे मला निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवले जात आहे. कोअर कमिटीतूनही काढून टाकण्यात आले आहे. पक्षातील काही नेते मला टार्गेट करत आहेत. माझ्यावर अन्याय, अत्याचार होत राहिल्यास मला वेगळा निर्णय घ्यावाच लागेल. मी काही देव नाही. पण निर्णय घेताना पक्षाला सांगूनच निर्णय घेईल, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले होते.