मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी काल ठाकरे कुटुंबियांचा आणखी एक घोटाळा बाहेर काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) आणि त्यांच्या कुटुंबियांवर नवा आरोप केला आहे.
हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी (Nandkishor Chaturvedy) याला कुठे लपवलं आहे याची माहिती जनतेला द्यावी अशी मागणी करत सोमय्या यांनी ठाकेर कुटुंबियांनी नंदकिशोर चतुर्वेदीसोबत मनी लॉन्ड्रींग केलं आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर हे ज्या श्री जी होम्स या कंपनीत पार्टनर आहेत, त्या कंपनीत 29 कोटींपेक्षा जास्त मनी लॉन्ड्रींग झालं आहे त्या कंपनीची आणि आपला काय संबंध आहे असा सवाल सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
श्री जी होम्स या कंपनीकडून मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं एक इमारत उभारण्यात आली. या इमारतीच्या बांधकामासाठी श्रीधर पाटणकर यांचा काळा पैसा वापरण्यात आला. या प्रकल्पातील २९ कोटी ६२ लाख रुपये आर्थिक गैरव्यवहाराच्या माध्यमातून कंपनीत आले, त्यासाठी श्रीधर पाटणकर यांनी हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदीची मदत घेतली. आता मुख्यंत्र्यांनी श्री जी होम्स या कंपनीशी आपले काय संबंध आहेत ते जाहीर करावं अशी मागणी केली आहे.
नंदकिशोर चतुर्वेदी याच्या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी कोट्यवधींचे व्यवहार केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.
प्रदीप कलमे फरार?
किरीट सोमय्यांवर आरोप करणारे प्रवीण कलमे कुठे आहेत असा सवालही सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. कलमे भारतात आहेत की विदेशात याची माहिती जितेंद्र आव्हाड देणार का असं सोमय्यांनी विचारलं आहे. कलमे यांनी सरकारी फाईलमधून कागद चोरले आहेत, कलमे यांना जितेंद्र आव्हाड, अनिल परब की उद्धव ठाकरे यांनी मदत केली असा आरोपही सोमय्यांनी केला आहे.