कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबई महापालिका सभागृहात आज राडा झाला. शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक आमने सामने आले. वरळीत काही दिवसांपूर्वी एका घरात सिलेंडर ब्लास्टची घटना घडली होती. यात 4 महिन्याचं बाळ गंभीररित्या भाजलं होतं. या बाळाला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारा अभावी या बाळाचा मृत्यू झाला.
या घटनेवरुन आक्रमक झालेल्या भाजप नगरसेवकांनी आरोग्य समितीचा राजीनामा दिला होता. हा मुद्दा आज सभागृहात चर्चेला आला. भाजप नगरसवेकांनी आक्रमक भूमिका घेतली. यावर बोलताना स्थायी समिती यशवंत जाधव यांनी भाजपचे लोक राजीनामा देतात, आम्ही शिवसेनेचे लोक मात्र लढतो असं वक्तव्य केलं. यावरुन भाजप नगर सेवक चिडले आणि त्यांनी यशवंत जाधव यांना घेरलं.
यानंतर शिवसेना नगरसेवकही आक्रमकही झाले आणि भर सभागृहातच शिवसेना आणि भाजप नगरसेवकांमध्ये तू तू मै मै चा सामना रंगला.
कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षात सभागृहाचं प्रत्यक्ष काम सुरु नव्हतं. त्यानंतर गेल्या आठवड्यात ही दुसरी सभा होती.
मुंबई सभागृहातील राड्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत शिवसेनेवर टीका केली आहे. या ट्विटमध्ये शेलार यांनी म्हटलंय, 'नायर रुग्णालय प्रशासन, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सिलेंडर स्फोटात भाजलेल्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेचे ही राजकारण करण्याचे पाप स्थायी समिती अध्यक्षांनी आज पालिका सभागृहात केले. कंत्राटदारांचे मुनीम झालेल्यांना चिमुकल्याच्या मृत्यूच्या वेदना कशा कळणार?
नायर रुग्णालय प्रशासन, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सिलेंडर स्फोटात भाजलेल्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेचे ही राजकारण करण्याचे पाप स्थायी समिती अध्यक्षांनी आज पालिका सभागृहात केले.
कंत्राटदारांचे मुनीम झालेल्यांना चिमुकल्याच्या मृत्यूच्या वेदना कशा कळणार? pic.twitter.com/bsUFSeRcDX— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 3, 2021