मुंबई : भाजपची आज तिसरी मेगा भरती. नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते गणेश नईक, काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील, काँग्रेसचे आनंदराव पाटील करणार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांच्या प्रवेशाबाबत अद्याप निर्यण झालेला नाही, अशी सूत्रांची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांना लागलेली गळती कमी झालेली नाही. दोन मेगाभरतीनंतर आज भाजपाची तिसरी मेगाभरती पार पडणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत अनेक दिग्गज नेते आज भाजपात प्रवेश करणार आहेत. मुंबईच्या गरवारे क्लब येथे दुपारी ३ वाजता भाजपची ही तिसरी मेगा भरती होणार आहे.
यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतले बडे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासह इंदापूरचे काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील आणि साताऱ्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले राष्ट्रवादीतच राहणार आहेत. त्यांचा भाजप प्रवेश सध्या बारगळला आहे. आज उदयनराजेंचा भाजपमध्ये प्रवेश होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.