मुंबई महापौरांच्या दिमतीला आज चक्क भाजप कार्यकर्त्याची गाडी

कट्टर शिवसैनिक असलेल्या मुंबईच्या महापौरांना आज चक्क भाजप कार्यकर्त्याची गाडी दिमतीला घ्यावी लागली. 

Updated: Feb 28, 2018, 10:39 PM IST
मुंबई महापौरांच्या दिमतीला आज चक्क भाजप कार्यकर्त्याची गाडी title=

मुंबई : कट्टर शिवसैनिक असलेल्या मुंबईच्या महापौरांना आज चक्क भाजप कार्यकर्त्याची गाडी दिमतीला घ्यावी लागली. 

वाहनचालकांनी आज कामबंद आंदोलन

महापालिकेच्या वाहनचालकांनी आज कामबंद आंदोलन पुकारल्यामुळं महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या गाडीवरही नेहमीचा चालक आला नाही. त्यामुळं दिवसभर महापौरांनी भाजपचा लोगो असलेली गाडी प्रवासाकरता वापरावी लागली. चालकांच्या कामबंद आंदोलनामुळं आयुक्त वगळता महापौर, समिती अध्यक्ष, आणि इतर अधिका-यांसाठी महापालिकेच्या गाड्या पोहोचल्याच नाहीत.

ओव्हरटाईम, भत्ते, गाडी लावण्याच्या जागा या मागण्यांसाठी

ओव्हरटाईम, भत्ते, गाडी लावण्याच्या जागा यांबाबत असलेल्या मागण्यांसाठी आज महापालिकेच्या वाहनचालकांनी कामबंद आंदोलन केले होते. त्याचाच परिणाम म्हणून महापौरांनाही गाडी घ्यायला गेली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या महापौरांवर आज भाजपच्या एका कार्यकर्त्याची गाडी वापरण्याची वेळ आली.

पालिका मुख्यालयात भाजपचा लोगो असलेली गाडी घेवून आलेल्या महापौरांना पाहून उलटसुलट राजकिय चर्चा सुरु झाल्यानंतर गाडीवरचा मागे आणि पुढील नंबर प्लेटशेजारी भाजपचा लोगो वरती कागद चिकटवून झाकावा लागला.परंतु लोगो झाकण्यापूर्वीचा फोटोही झी २४ तासकडे आहे. महापौरांनी मात्र सदर गाडी भाजप कार्यकर्त्याची नसून शाखाप्रमुखाची असल्याचे सांगितले.