वरळीतील उच्चभ्रू सोसायटीला छुप्या टाक्यांमधून पाणीपुरवठा

या टाक्यांना दिलेल्या नळजोडण्या अधिकृत आहेत की अनधिकृत, याचा शोध पालिकेकडून सध्या सुरू आहे.

Updated: May 9, 2019, 07:26 PM IST
वरळीतील उच्चभ्रू सोसायटीला छुप्या टाक्यांमधून पाणीपुरवठा

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पाण्याची कपात केली जात असली तरी वरळीतल्या उच्चभ्रू आणि राजकारण्यांच्या सोसायटीतील लोकांनी मात्र यावर धक्कादायक उपाय शोधला आहे. वरळीतल्या जयवंत पालकर मार्गाजवळ एका डोंगराचे सपाटीकरण करून याठिकाणी प्रत्येकी १० हजार लिटर क्षमतेच्या चार मोठय़ा टाक्या छुप्या पद्धतीने उभारण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे महापालिकेनेही या टाक्यांसाठी जलजोडणीही दिली आहे. 

राजकीय नेत्यांचे वास्तव्य असलेल्या ‘वैनगंगा’ इमारतीला या टाक्यांमधून पाणीपुरवठा केला जातो. या टाक्यांना दिलेल्या नळजोडण्या अधिकृत आहेत की अनधिकृत, याचा शोध पालिकेकडून सध्या सुरू आहे. मात्र, आसपासच्या परिसरात कमी पाणी मिळत असताना या एकाच इमारतीतल्या रहिवाशांवर एवढी मेहेरबानी कशी असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला आहे.

सध्या दुष्काळामुळे राज्यातील बहुतांश ग्रामीण भागात पाण्याची कमालीची टंचाई जाणवायला लागली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहण्यावाचून पर्याय नाही. आजच्या घडीला महाराष्ट्रातल्या धरणांमध्ये केवळ २०.२८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जिह्यांमध्ये दर आठवडय़ाला दोनशे टँकरची मागणी वाढत आहे. मे महिन्यात पाण्याची मागणी वाढतच जाणार आहे. राज्यात मे २०१६ सारखी भीषण पाणीटंचाई होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. गेल्यावर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला राज्यात फक्त ११०० टँकर्सच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, यंदा टँकरची संख्या पाच पटीने वाढल्याचे दिसून येत आहे.