Mumbai Crime: दुकानातून लसूण चोरली म्हणून बेदम मारहाण केल्याचा प्रकार बोरिवलीतून समोर आला आहे. घनश्याम आगरी या 56 वर्षीय दुकानदाराने आपला कर्मचारी पंकज मंडल याला मरेपर्यंत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. यातच कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. यानंतर दुकानदाराला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकानदार मूळचा बोरिवलीचा आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गेल्या काही आठवड्यांमध्ये, घटत्या पुरवठामुळे काही भागात लसणाचे दर ₹400 प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. बुधवारी रात्री उशीरा लोडर म्हणून काम करणाऱ्या पंकजने लसूणची गोणी चोरताना पकडला गेला. त्यावेळी दुकानमालक घनश्याम आगरीने कर्मचाऱ्याला फुटपाथवर नेऊन मारले. ही मारहाण इतकी जबर होती की कर्मचाऱ्याच्या तोंडून रक्त वाहू लागले होते. अखेर तो कर्मचारी बेशुद्ध पडला. मारहाण केल्यानंतर कर्मचाऱ्याला फुटपाथवरच सोडल्याची कबुली घनश्यामने दिली. गुरुवारी सकाळी 6 च्या दरम्यान पोलिसांना याबद्दल माहिती कळविण्यात आली. कर्मचारी पंकज हा बोरिवलीतील एमटीएनएल बिल्डिंगजवळच्या फुटपाथवर बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मी कर्मचारी पंकज याला लसूणची गोनी घेऊन बाजारातून बाहेर पडताना पाहिले होते. तो आपल्या दुकानातून लसणाची भरलेली गोणी चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचे माझ्या लक्षात आले. म्हणून त्याला मारहाण केल्याची कबुली घनश्यामने दिली. लोडरला मारहाण केल्यानंतर आगरीने त्याला जबरदस्तीने मार्केटमधून बाहेर काढले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
चोरी करणारा पंकजा हा बेघर असून फुटपाथवर राहतो. घनश्यामने मारहाण केल्यानंतरही तो बाजाराच्या बाहेरील फुटपाथवर झोपला. दरम्यान आम्ही घनश्याम आगरी याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्याला अटक केली असल्याची माहिती बोरिवली पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.