मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी महाराष्ट्रात येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन केले. या आंदोलनावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्ष आणि सत्तासहकारी भाजपला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. हे बोल सुनावताना अकोल्यातील शेतकऱ्यांचा उद्रेक सरकारने वेळीच समजून घेतला पाहिजे आणि आश्वासनांची पूर्तता केली आहे. थापा मारून व टोप्या घालून फार काळ राजकारण करता येणार नाही, अशा स्पष्ट शब्दात सल्लारूपी टोला लगावला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखलेल्या दै. सामनात उद्धव ठाकरे यांनी 'अकोल्यातील उद्रेक!' या मथळ्याखाली एक लेख लिहीला आहे. या लेखात, 'यशवंत सिन्हा हे कधीच मोठे लोकनेते नव्हते. ते नोकरशहा होते. मग राजकारणात आले. तरीही शेतकरी त्यांच्या आंदोलनात सहभागी होत असतील तर ही भाजप व सरकारसाठी धोक्याची घंटा आहे. अकोल्यातील शेतकऱ्यांचा उद्रेक सरकारने वेळीच समजून घेतला पाहिजे आणि आश्वासनांची पूर्तता केली आहे. थापा मारून व टोप्या घालून फार काळ राजकारण करता येणार नाही. शेतकऱ्यांनी हेच सांगितले आहे. आम्ही शेतकऱ्यांबरोबर आहोतच!', असे म्हटले आहे.
दरम्यान, 'सरकारने त्याबाबतही आश्वासन दिल्याने सिन्हा यांनी बुधवारी आंदोलन मागे घेतले. अर्थात, आता खरी जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. कारण आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची तशी फसवणूकच झाली आहे. कर्जमाफीप्रमाणे या आश्वासनांच्या अंमलबजावणीची गत होऊ नये. कारण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजवटीपेक्षा भारतीय जनता पक्षाच्या राज्यकर्त्यांकडून ही फसवणूक झाल्याची खदखद जास्त आहे', असेही ठाकरे यांनी सामनातील लेखात म्हटले आहे.
'यशवंत सिन्हा हे भारतीय जनता पक्षातील ‘टाकाऊ’ व ‘बिनकामाचे’ नेते आहेत असे काही लोकांचे म्हणणे आहे. मग सिन्हा यांना विदर्भात इतका पाठिंबा का मिळाला व चंद्रकांत पाटलांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्व मंडळींकडून सिन्हा यांनी आंदोलन मागे घ्यावे अशी मनधरणी का केली गेली?' असा सवाल विचारत 'अकोल्यातील शेतकऱ्यांचा उद्रेक सरकारने वेळीच समजून घेतला पाहिजे आणि आश्वासनांची पूर्तता केली पाहिजे', अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.