पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला?

राज्यात सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतेय

Updated: Jun 15, 2019, 11:04 AM IST
पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला?  title=

अमित जोशी, झी २४ तास, मुंबई : होणार... होणार... अशी ज्याची सर्वदूर चर्चा आहे त्या राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्या अर्थात रविवारी सकाळी ११ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार, अशी चर्चा सुरू आहे. उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणकोणत्या नव्या मंत्र्यांची वर्णी लागणार? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. रविवारी शपथविधीनंतर नवनिर्वाचित मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होऊ शकतात. 

राज्यात सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतेय. हे अधिवेशन सुरू होण्याआधीच मंत्रिमंडळ विस्तार उरकण्याचा प्रयत्न होत असल्याचीही चर्चा सुरू आहे. १४ जून रोजी होणारा मंत्रिमंडळ विस्ताराचा प्लान बारगळला होता. आता मात्र, उद्या १६ जून रोजी हा मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं आता निश्चित मानलं जातंय.
   

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात शुक्रवारी रात्री उशिरा एक बैठक पार पडली. 'मातोश्री'वर झालेल्या या बैठकीबद्दल खुद्द मुख्यमंत्र्यांनीच ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिलीय. मुख्यमंत्री फडणवीस आज नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला आहेत. यावेळी अमित शाह, आणि नितीन गडकरी यांची भेटही घेणार आहेत. पक्षश्रेष्ठींनी मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील दाखवला तर राज्य अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे.