मुंबई: वसईतल्या नवापूर समुद्रकिनारी काही तरुणांनी स्टंटबाजीसाठी कार समुद्रात उतरवल्याचा प्रकार समोर आला आहे. गाडीची चाकं रेतीत रुतल्याने गाडी बराच वेळ अडकली होती. भरती आल्यानंतर ही गाडी लाटांवर तरंगत होती.
अरबी समुद्राला उधाण येणार असल्यानं पर्यटकांना समुद्रकिनारी फिरताना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत या तरुणांनी आपला जीव धोक्यात घालून गाडी किनाऱ्यावर उतरवली होती. चारचाकी चालकांच्या मनमानीमुळे सध्या वसईतील समुद्रकिनारे पर्यटकांसाठी धोकादायक ठरत आहेत.
चारचाकी गाडय़ांना समुद्रकिनाऱ्यावर बंदी असतानादेखील या ठिकाणी अनेक पर्यटक स्टंट करताना दिसून येतात. त्याचा इतर पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. वसईच्या समुद्रकिनारी पर्यटनासाठी चांगला वाव असताना याठिकाणी धूप प्रतिबंधक किनारे नसल्याने बहुतांश किनारे नष्ट झाला आहे. किनाऱ्यालगतची शेकडो झाडे भरतीच्या पाण्यामुळे नष्ट झाली. मात्र, धूपप्रतिबंध किनारे नसल्याने काही धटिंगणांना मोकळे रान मिळाले आहे.
काही तरुण त्यांच्या गाडय़ा थेट किनाऱ्यावरच नेत आहेत. असे स्टंट करताना एखादेवेळी गाडीची धडक लागून दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी पोलिसांचा वचक नसल्याने चारचाकी चालक आपली मनमानी करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.