मुंबई : मुंबईतल्या वाढत्या ट्रॅफिकला कंटाळून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ट्रेनच्या प्रवासाला पसंती दिली. काल ते मीरा भाईंदर महापालिकेच्या प्रचारसभेसाठी मिररोड इथे आले होते. मुंबईहून मिरारोड इथे रस्ते मार्गाने येताना त्यांना तब्बल ३ तास लागले होते.
या प्रवासाला कंटाळून त्यांनी मुंबईला परतताना ट्रेननं जाण्याचा निर्णय घेतला. रात्री प्रचारसभा संपल्यावर त्यांनी मीरारोड रेल्वे स्थानकातून १० वाजून २७ मिनिटांची चर्चगेटला जाणारी जलद लोकल पकडली. ब-याच वर्षांनी म्हणजेच महाविद्यालयीन दिवसांनंतर पहिल्यांदाच आपण लोकल प्रवास केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
मुंबईतल्या वाढत्या वाहतूक कोंडीच्या तुलनेत ट्रेनचा प्रवास कधीही बरा, असं सांगायलाही ते विसरले नाहीत. मात्र त्याचवेळी हा ट्रेनचा प्रवास अशोक चव्हाण यांनी सकाळी ऐन गर्दीतून करुन दाखवावा, असा सूर यावेळी इतर प्रवाशांतून उमटला.