मुंबई : राज्यातील सत्तेत एकत्र असूनही भाजपा आणि शिवसेना यांच्यातील वाद वेळोवेळी समोर येत असतो. निवडणुकीच्या तोंडावर तर एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात. पण तरीही दोघांमध्ये गुफ्तगू आहे हे वारंवार दिसून येते. आजही असाच प्रसंग पाहायला मिळाला.
गेल्या आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बातचित केली होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणात काय घडामोडी घडतील याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबतच्या या 'गुफ्तगू' ने चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुख्यमंत्र्यांनी शिवतिर्थावर बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर महापौर बंगल्यामध्ये बंद दाराआड दोघांमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या चर्चेतून काय निष्पन्न होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत.
‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि ऊर्जा यामुळे तळागाळातील सामान्य माणूस उभा राहू शकला. आज त्यांच्या स्मृतिस्थळावर ती ऊर्जा घेण्यासाठी आलो आहोत’अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात राज्य आणि देशपातळीवरील राजकीय घटनांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भातही चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.