मुंबई : पुण्यातल्या लॉकडाऊनवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांचं नाव न घेता टोला हाणला आहे. पुण्यातील लॉकडाऊन घाईघाईने उठवला, त्याला मुख्यमंत्र्यांचा विरोध होता, पुण्याकडे पहिल्यापासून लक्ष देणं गरजेचं आहे, असं मुख्यमंत्र्यांचं मत होतं, असं संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत यांनी नाव न घेता अजित पवारांना कानपिचक्या दिल्या आहेत.
पुण्यासारख्या ठिकाणी ऍम्ब्युलन्स मिळू नये, हे आरोग्य यंत्रणेचं निदर्शक आहे. सरकारने यापुढे काळजी घेणं गरेजचं आहे, अशी प्रतिक्रियाही संजय राऊत यांनी दिली आहे. आता पुण्यामध्ये मुंबई पॅटर्न राबवण्यात येत आहे. तिकडे काही अडचणी असतील, तर त्या दुरुस्त करून जनतेला उत्तम सुविधा द्यायची जबाबदारी फक्त सरकार किंवा महानगरपालिकेची नाही, तर विरोधी पक्ष म्हणून सगळ्यांची आहे, असं वक्तव्य राऊत यांनी केलं आहे.