मुंबई : सागरी किनारा महामार्गावर भूमीपूजनाच्या सरकारी कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित असतील, कारण तेव्हा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, असा दावा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलाय.
सागरी मार्गाच्या महापालिकेनं केलेल्या भूमीपूजनाला मुख्यमंत्र्यांना बोलावण्यात आलं नव्हतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमीपुजन करण्यात आले. त्याबाबत विचारलं असता महाडेश्वर यांनी हे विधान केले आहे. तर कल्याणमधल्या पंतप्रधानांच्या आजच्या कार्यक्रमाला सर्व परवानग्या होत्या की नाही, याची आपल्याला माहिती नसल्याचं महाडेश्वर म्हणाले. पंतप्रधानांच्या स्वागताला राजशिष्टाचाराचा भाग म्हणून केवळ उपस्थित राहिल्याचा दावाही महापौरांनी केलाय.
दरम्यान, सागरी किनारा महामार्ग प्रकल्पामुळे आपल्या पारंपरिक मासेमारी व्यवसायावर येणारं संकट लक्षात घेत कोळी समाजाने प्रकल्पावर आक्षेप घेतलाय. कोळी समाजाकडून उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपाची दखल घेत मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, पक्षाचे आमदार सुनील शिंदे तसंच महापालिकेतील शिवसेनेच्या अन्य नेत्यांनी आज वरळी कोळीवाड्यातील मच्छीमार संघटनांच्या प्रतिनिधींशी प्रत्यक्ष जेटीवर जाऊन चर्चा केली. त्यांच्या आक्षेपामागची कारणं जाणून घेतली. प्रकल्पामुळे समुद्रातल्या प्रभावित होणाऱ्या भागाची महापौरांनी यावेळी पाहाणी केली. तसंच याप्रकरणी लवकरच मार्ग काढण्याचं आश्वासन कोळी समाजाला दिलं.