मुंबई : सत्तास्थापनेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. शरद पवारांनी काँग्रेस नेते अहमद पटेल यांना फोन करून दोन दिवसांची मुदत मागितल्याचा दावा काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंनी केला आहे. मात्र असा कुठलाही फोन राष्ट्रवादीकडून गेला नसल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी झी २४ तासशी बोलताना दिली. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही आपण माणिकराव ठाकरेंना नव्हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीना ओळखतो असा टोला लगावला आहे.
काँग्रेससोबत निवडणूक लढवल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र चर्चा करुन निर्णय़ घेतील. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. पण शिवसेनेशिवाय सत्तास्थापन शक्य नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे. शिवसेनेला सोमवारी सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र न मिळाल्याने शिवसेनेत पुन्हा शांतता पसरली आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना फोन करुन नाराजी देखील व्यक्त केल्याची माहिती मिळते आहे. पण अजित पवार यांनी याचं खापर काँग्रेसवर फोडलं आहे. काँग्रेसने पत्र द्यायला उशीर केल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसचे आमदार जयपूरला आहेत, त्यांचे वरिष्ठ नेते दिल्लीला आहेत, त्यामुळे निर्णय घ्यायला उशीर झाला. महाराष्ट्रातील नेत्यांना लवकरात लवकर येण्यासाठी सांगितलं होतं. पण ते अजूनही दिल्लीत आहे. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.