मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत हे कायमच आपल्या लेखणीतून आणि बोलण्यातून फटकारे मारतात आपण पाहिले आहेत. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे 'लॉकडाऊन' असताना त्यांच एक वेगळं रूप समोर आलं आहे. संजय राऊत यांची मुलगी पुर्वशी राऊत हिने एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. हा व्हिडिओ प्रत्येकालाच सुखद धक्का देणारा आहे.
संजय राऊत आतापर्यंत पडखर लेखणीतून आपल्यासमोर आले. पण या व्हिडिओतून त्यांच्यातील एक पेटीवादक समोर आला आहे. ही फेसबुक पोस्ट शेअर करताना त्यांची मुलगी म्हणते की,''सामना'चा संपादक म्हणून, शिवसेना नेता म्हणून तो फक्त फटकारे मारतो असा एक गैरसमज आहे. तो रूक्ष असावा असे अनेकदा अनेकांनी म्हटले आहे. पण तो तसा नाही. तो राजकारणा पलीकडे वाचतो , ऐकतो आणि बोलतो. तो आजही सैगल , बेगम अख्तर , चंद्रू आत्मा ऐकतो.. ऐकताना गुणगुणतो....ते गुणगुणणे मनापासून असते. तो मूडमध्ये असला की त्याची बोटे टेबलावर तालात थिरकतात.. आज खुप वर्षांनी तो सक्तीने घरी होता. त्याचे रेग्युलर वाचन आणि लिखाण आटोपल्यावर त्याने त्याची लाडकी पेटी बाहेर काढली..ती स्वतः साफ केली... आणि आजची आमची संध्याकाळ संगीतमय करून टाकली.'
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 'लॉकडाऊन' करण्यात आलं आहे. वृत्तपत्राची सेवा देखील काही दिवस खंडीत करण्यात आली आहे. कोरोनाशी दोन हात करायचा तर घरीच राहणं हा एकच उपाय असल्याचं सांगण्यात येतंय. अशावेळी शिवसेनेत महत्वाची भूमिका बजावणारे संजय राऊत देखील आपला वेळ कुटुंबासोबत घालवतात तेव्हा.... हे चित्र त्यांच्या कुटुंबियांना खरंच सुखावणारं असेल. कामाच्या गडबडीत असणारी ही मंडळी जेव्हा निवांत दिसतात तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना समाधान वाटतं असतं. आणि हेच समाधान त्यांच्या मुलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलं आहे.