Dentist Kills Wife In Front Of 4 Year Old Son: चार वर्षांच्या एका मुलासमोरच त्याच्या वडिलांनी पत्नीची हत्या केली. आपल्या आईची हत्या होत असल्याचं पाहिल्यानंतर 4 वर्षांनी या मुलाने जबाबामध्ये पोलिसांना सांगितलं. याच जबाबानंतर सत्र न्यायालयाने सोमवारी दादरमधील 48 वर्षीय डेंटिस्टला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने 2016 साली आपल्या 36 वर्षीय अकाऊटंट पत्नीची भोसकून हत्या केली होती. मरण पावलेल्या माहिलेचं नाव तनुजा बोबाले असं आहे. तनुजा यांच्या शरीरावर एकूण 37 जखमा होत्या. आरोपी पती उमेशने 11 डिसेंबर 2016 रोजी पत्नीची हत्या करुन स्वत: पोलिसांना फोन करुन आत्मसमर्पण केलं होतं.
प्रमुख साक्षीदार म्हणून ज्या लहान मुलाचा जबाब ग्राह्य धरला त्याला याचिकाकार्त्या आणि बचाव पक्षाने एकूण 54 प्रश्न विचारले, असं 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.. 2020 मध्ये जबाब नोंदवताना हा मुलगा दुसऱ्या इयत्तेमध्ये शिकत होता. जेव्हा वडिलांनी आईवर चाकूने हल्ला केला ते दृष्य पाहून मी आरडाओरड केला नाही. 'मात्र माझ्या छातीमध्ये धडधड वाढल्याचं मला जाणवलं,' असं या मुलाने कोर्टासमोर सांगितलं. आईची हत्या झाली तेव्हा आपण तिथेच उपस्थित होतो असंही या मुलाने सांगितलं. "रात्री माझ्या वडिलांनी माझ्या आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. वडिलांनी नंतर मला माझ्या आजीच्या खोलीमध्ये कोंडलं," असं या मुलाने सांगितलं.
आरोपीने करुन घेतलेली डीएनए चाचणी
तनुजाच्या भावाने नोंदवलेल्या जबाबामध्ये त्याची बहीण रात्री उशीरापर्यंत काम करायची. त्यामुळेच उमेशला तिच्या चारित्र्याबद्दल संक्षय निर्माण झाला. उमेशने डीएनए चाचणी केली होती. हा मुलगा आपला नाही असा उमेशचा दावा होता असंही मृत महिलेच्या भावाने म्हटलं आहे. मात्र उमेशने केलेले दावे चुकीचे असल्याचं नंतर सिद्ध झालं.
10 जणांची साक्ष नोंदवली
विशेष सरकारी वकील आर. व्ही. किनी यांनी 10 साक्षीदारांची चौकशी केली. यामध्ये या लहान मुलाबरोबरच, मृत महिलेचा भाऊ, आरोपीची मामी, इमारतीच्या वॉचमनचाही समावेश होता. आपण मानसिक दृष्ट्या आजारी होतो. आपण नेमकं त्यावेळी काय करत होतो याची शुद्ध नव्हती, असा दावा उमेशने कोर्टासमोर केला. मात्र कोर्टाने हा दावा फेटाळून लावला.
2009 मध्ये अनुजाने उमेशविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अनुजा पतीपासून वेगळी राहत होती. अनुजा तिच्या मावशीच्या घरी राहायची. उमेश हा घटस्फोटित होता. अनुजा त्याची दुसरी पत्नी होती. "आरोपी उमेश बोलालेला भारतीय दंड संहितेमधील कलम 302 (हत्या) अंतर्गत दोषी ठरवण्यात येत आहे. त्याला जन्मठेपेची शिक्षा आणि 20 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली जात आहे," असं न्यायमूर्ती पी. पी. बैंकर यांनी निकाल देताना सांगितलं.
उमेशला 11 डिसेंबर 2016 मध्ये अटक केल्यापासून तो तुरुंगामध्येच आहे. त्याला जामीन देण्यात आलेला नाही. सध्या हा मुलगा त्याच्या मामाच्या घरी राहतो.