मुंबई : गेल्या तीन महिन्यांची सरसकट आणि वाढीव वीजबिले पाठवल्याने सर्वसामान्य ग्राहक प्रचंड आर्थिक अडचणींना सामोरे जातो आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
फडणवीसांनी म्हटलं की, 'कोरोनामुळे 3 महिन्यांपासून टाळेबंदी होती. या तीन महिन्यांत घरगुती ग्राहकांना सरासरी बिले पाठविण्यात आली आणि ती त्यांनी भरली. आता परवानगी दिलेल्या ठिकाणी रिडिंग घेऊन बिले पाठविल्याचे सांगण्यात आले आहे. ती बिले आकारताना त्यात जुनी भरलेली रक्कम वजा न करण्यात आल्याने प्रचंड रकमा बिलाच्या देयकापोटी भरण्यास घरगुती नागरिकांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यभरातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. कोरोना टाळेबंदीमुळे अनेकांना वेतनाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. अशात एकदम तीन महिन्यांची विजबिले आल्यामुळे ती एकरकमी भरण्याच्या समस्या त्यांच्यापुढे निर्माण झाल्या आहेत.'
त्यांनी पत्रात म्हटले की, दहा-दहा हजार रूपयांपर्यंत बिले नागरिकांना आली आहेत. एकिकडे ही समस्या असताना दुसरीकडे औद्योगिक ग्राहकांची सुद्धा तीच अवस्था आहे. तीन महिने उद्योग बंद असताना सुद्धा त्यांना भरमसाठ वीजबिल आकारण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनाही आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. घरगुती ग्र्राहक आणि उद्योग अशा दोघांच्याही समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. सरासरी भरलेली बिले आणि आता तीन महिन्यांचे एकत्रित देयक यामुळे प्रचंड आर्थिक भार घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांवर पडला आहे. एकतर घरगुती ग्राहकांकडून टाळेबंदीच्या काळातील 300 युनिटपर्यंतचे वीजबिल माफ करण्यात यावे, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. त्यावर कुठलाही निर्णय न घेता सरसकट बिले पाठविण्यात आली आहेत.'
वीजबिलांचा घरगुती ग्राहकांवर नाहक भुर्दंड टाकून सरसगट तीन महिन्यांची वीज बिले दिल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत असल्याबाबत तसेच उद्योग बंद असताना त्यांनाही बिले दिले जात असल्याबाबत मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांना पत्र ... pic.twitter.com/oQo2vF9DzL
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 22, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर अभियानातून विविध राज्यातील वीज वितरण कंपन्यांना सुमारे 90 हजार कोटी रूपयांचे कर्ज पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (पीएफसी) आणि रूरल इलेक्ट्रीफिकेशन कार्पोरेशन (आरईसी) यांच्यामार्फत उभारण्याची परवानगी दिली आहे. हेही स्पष्ट करण्यात आले आहे की, कोरोनाच्या काळात वसुली होणे शक्य नसल्याने हे 'लोन अगेन्स्ट रिसिव्हेबल' आहे. त्यामुळे ग्राहकांवर ताण न टाकता कंपन्यांना भांडवल उभारता येईल आणि यथावकाश टप्प्या-टप्प्याने वसुली झाल्यावर ते परत देखील करता येईल. त्यामुळे आज ग्राहकांकडून सक्तीने वसुली न करता, त्यांच्यावर सरसगट आर्थिक भार न टाकता, सुयोग्य मासिक हप्त्यांमध्ये त्यांना वीजबिल भरण्याची मोकळीक देणे नितांत गरजेचे आहे. यादृष्टीने राज्य सरकारतर्फे निर्णय घेतला जाईल, अशी मला आशा आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.