दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या त्या 833 विद्यार्थ्यांना, न्याय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपिल करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना दिलं आहे. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी एमपीएससी मार्फत निवड झालेल्या 833 विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील करावे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली.
याबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात अपील करून या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना दिले आहे.
एमपीएससीमार्फत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी निवडण्यात आलेल्या 833 उमेदवारांच्या भरतीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे निवड होऊनही या उमेदवारांना नियुक्ती मिळत नाही.
याप्रकरणी सरकारने न्यायालयात योग्य भूमिका न मांडल्यानेच या अन्याय झाल्याची या उमेदवारांची भावना आहे. यासंदर्भात आज धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेऊन या विद्यार्थ्यांचे म्हणणे त्यांच्यासमोर मांडले.