मुंबई : धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण आता शिवसेनेकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. एकीकडे संजय राऊत यांनी राज्यातील भाजप सरकारला या घटनेसाठी जबाबदार असले तरी निलम गो-हे यात कॉंग्रेसचा वाटा असल्याचे म्हटले आहे.
‘या अनास्थेमध्ये ९० टक्के वाटा कॉंग्रेस सरकारचा आहे. या जमीन आणि प्रकल्पाचे सर्व निर्णय मागच्या सरकारच्या काळात घेतले गेले. त्यामुळे या घटनेमध्ये ९० टक्के वाटा हा मागच्या सरकारचा आहे.
त्यावेळचे ऊर्जा मंत्री अजित पवार होते. कॉंग्रेस सरकारमधल्या महसूल आणि ऊर्जा विभागाने हे जमीन संपादनाच्या निर्णयावर अंतिम मोहोर लावली होती’, असे निलम गो-हे म्हणाल्या.
‘ही आत्महत्या नाही तर हत्या आहे, ज्याला सरकार जबाबदार आहे. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. राज्य सरकारला हा कलंक लावणारा प्रकार असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
ते म्हणाले की, ‘शेतक-यांच्या आक्रोशानेही सरकारला ऐकू येत नाही. शेतक-यांच्या रक्तावर वीट रचू देणार नाही, ही भूमिका समृद्धी महामार्गाबाबत शिवसेनेने मांडली. विकास हवाय, पण शेतक-यांचे असे मृत्यू जर मंत्रालयाच्या दारात होत असतील असा विकास नकोय. ३ वर्षात ३ हजार शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. एजंटगिरी रोखण्यात सरकार असमर्थ ठरलंय’, असं संजय राऊत म्हणाले.