दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : पुणे येथील डीआयजी निशिकांत मोरे याला निलंबित करण्यात आलं आहे. निशिकांत मोरेसह पीडीत मुलीला धमकी देणारा पोलीस खात्यातील ड्रायव्हरला देखील निलंबित करण्याचा निर्णय राज्याच्या गृह खात्याने घेतला आहे. दुसरीकडे पीडीत मुलीच्या वडलांना धमकी दिल्याप्रकरणी निलंबित ड्रायव्हरवर आता काय कायदेशीर कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील पोलीस खात्यातील निलंबित हवालदाराचं नाव दिनकर साळवे असं आहे.
पुण्याचा निलंबित डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणारी अल्पवयीन मुलगी अजूनही बेपत्ता आहे. आता या प्रकरणाला आणखी एक नव वळण लागलं आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे ड्रायव्हर असलेल्या पोलिसांकडून धमक्या येत असल्याची तक्रार पीडित मुलीच्या वडलांनी केली आहे.
पनवेल कोर्टात मंगळवारी दुपारी निलंबित डीआयजी निशिकांत मोरे यांच्या अटकपूर्व जामिनाची सुनावणी होती. या दरम्यान थेट कोर्ट परिसरातच मुलीच्या वडीलांना धमकी देण्यात आली. ‘शांत रहेनेका, मै उध्दव ठाकरे का ड्रायव्हर हूँ’अशी धमकी या इसमानं दिली असल्याचे पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितलं आहे.