कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर रविवारी अनंतात विलीन झाल्या. शरिरातील अवयवयांनी काम करणं बंद केल्यामुळे लता दीदींच वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. ८ जानेवारी रोजी लता दीदी ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर डॉ. प्रतीत समदानी उपचार करत होते.
२०१९ पासून डॉ. प्रतीत समदानी लता दीदींवर उपचार करत होते. एवढ्या वर्षांचा त्यांना सहवास आणि ते अखेरचे दिवस..... ज्या डॉक्टरांना आपण माणसातले 'देव' समजतो. त्यांनी गानसरस्वतीचा 'तो' जगण्यातला संघर्ष पाहिली... लता दीदींसोबतच्या त्यांच्या अखेरच्या आठवणी.....
२०१९ मध्येच समदानी पहिल्यांदा दीदींना भेटले. डॉक्टरांशी दीदींचं नातं इतकं घट्ट झालं, की कोविडमुळं त्यांची भेट घेणं अशक्य असल्यामुळं व्हीडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांच्या प्रकृतीची चौकशी होऊ लागली.
आरोग्याबाबत चर्चा झाल्यानंतर आयुष्य, कार्यक्रम, आठवणी अशा चौफेर गप्पा दीदी आणि डॉक्टरांमध्ये रंगत असत. यातच डॉक्टरांच्या मुलीचं आमि दीदींचं नातं आकारास आलं.
अनेकदा दीदी तिच्याशीच संवाद साधताना दिसत. त्यांना तिला भेटायचंही होतं. पण, कोरोना काळामुळं ते शक्य झालं नाही. दीदींच्या जाण्याचं समदानी यांच्या मुलीला कळताच त्या चिमुकलीलाही भावना दाटून आल्या.
यावेळीसुद्धा दीदींना बरं करुन आपण घरी पाठवू अशी डॉक्टरांना आशा होती. पण, वाढतं वय आणि खालावणारी प्रकृती ही आव्हानं अधिक गंभीर झाली आणि दीदींनी अखेरचा श्वास घेतला.