मुंबई : राज्यात शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात खडाजंगी सुरू असताना केंद्र सरकारनेही वादात उडी घेतली आहे. तत्कालिन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडील खात्याच्या गेल्या अडीच वर्षातील कामाचे ऑडिट केंद्राने सुरू केलं आहे. यात विशेषतः महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभार केंद्रस्थानी ठेवण्यात आला आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभाराबाबत काही नव्या सूचना, उपाययोजना होणार असतील तर चांगलेच पण उगाच मंडळ बदनामीचे धनी होऊ नये, अशी अपेक्षा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या ऑडिटमुळे कर्मचारी, अधिका-यांचेही धाबे दणाणले आहेत.
मुंबईतील मुख्यालय, पुणे, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, संभाजीनगर या कार्यालयांमध्ये ऑडिट करण्यात येणार आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात पर्यावरण मंत्रीपद हे अदित्य ठाकरे यांच्याकडे होते. ठाकरे पर्यावरण मंत्री असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयांची तसेच महत्वाच्या प्रकल्पांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे पर्यावरणाची हानी झालीये का? याबाबत केंद्राच्या वतीने माहिती घेण्यात येणार आहे.