गुवाहाटी : शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदारांच्या झालेल्या बैठकीत आज गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर मिश्किल शब्दात टीका केली. बंडखोर आमदारांच्या बैठकीत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाबतही महत्वाचे विधान केले.
'आपण 39 आमदार आणि इतर अपक्ष मंडळी त्यांना विधीमंडळात उत्तर देण्यास पुरेसे आहोत. उद्धव ठाकरे यांना आपण सर्व भूमिका सांगितली. परंतू त्यांनी वर्षा बंगला सोडला, त्यांनी आपल्याच आमदारांना सोडलं, सगळ्यांना सोडलं पण ते शरद पवार यांना सोडायला तयार नाही.' असे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत भावनिक विधान केले.
'आम्ही त्यांच्यासाठी काहीच केले नाही का? आमची परिस्थिती नसताना आम्ही पक्षासाठी खूप काम केले. आजच्या पक्षाच्या वैभवात आमचाही काही वाटा आहे. आम्ही घरावर तुळशीपत्र ठेऊन काम करणारे लोकं आहोत. आयत्या बिळावर नागोबा असणारे आम्ही नाही.' असेही पाटील यांनी यावेळी म्हटले.
संजय राऊत यांच्यावर टीका
'संजय राऊत म्हणतात त्यांना टपरीवर पुन्हा पाठवू. चुना कसा लावतात त्यांना अद्याप माहिती नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा त्यांना चुना नक्की लावेल. आपण एकत्रित ही लढाई सुरू केली आहे. आणि एकत्रितरित्या जिंकू. ' अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.