मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु असतानाच दुसरीकडे पावसाचीही दमदार बॅटींग सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण आणि महाराष्ट्रातील उर्वरित भागामध्ये पावसाची संततधार सुरुच आहे. हेच एकंदर चित्र पाहता पुढील पाच दिवसही पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होशाळीकर यांनी ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली. ज्यामध्ये २५ ऑगस्टपर्यंतच्या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यमानाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवल्याचं स्पष्ट करण्यात आलं. हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि परिसरातील प्रशासकीय यंत्रणांनाही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे आणि पालघर या भागांमध्ये येत्या काही दिवसांमध्ये होणाऱ्या पावसाचा अंदाज पाहता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी मुंबईसह नवी मुंबई भागातही झालेल्या पावसाचा अंदाज पाहता पुढील काही दिवसांमध्ये पाऊस जोरदार बॅटींग करणार आहे.
Weather warning for next 5 days issued by IMD on 21 Aug pic.twitter.com/tNVuauxywJ
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 21, 2020
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरु असणारी लगबग आणि त्यातच पावसाची हजेरी पाहता यंदाच्या वर्षी खरेदीसाठी नागरिकांना वाव मिळाला नाही. त्यातही कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचं सावट असल्यामुळं बाजारपेठांमध्येही उत्साह काहीसा कमीच दिसला.