मुंबई: शिवसेनेच्या विरोधामुळे सोमवारी पुन्हा एकदा नारायण राणे यांचा भाजपप्रवेश बारगळला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नारायण राणे यांनी युती झाल्यावर आपण भाजपमध्ये प्रवेश करु, अशी प्रतिक्रिया देत संभ्रम आणखीनच वाढवला.
आज सकाळपासून नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, काही कारणाने राणे यांचा प्रवेश पुन्हा एकदा लांबवणीवर पडला. यासाठी शिवसेनेचा विरोध कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.
या सगळ्या घडामोडींनंतर नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, माझ्यामुळे युती आणखी भक्कम होईल. युती झाली की मी भाजपमध्ये प्रवेश करेन. मुख्यमंत्री योग्यवेळी निर्णय घेतील, असे राणे यांनी म्हटले.
तसेच माझ्यासाठी प्रत्येक दिवस हा शुभ आहे. मी केवळ योग्य वेळेची वाट पाहत आहे. मुख्यमंत्री शिवसेनेच्या विरोधाला जुमानतील असे वाटत नाही. मात्र, माझा शिवसेनेला कोणताही विरोध नाही. कारण, युती झाली किंवा न झाली तरी माझा भाजपप्रवेश निश्चित असल्याचे राणे यांनी सांगितले.
येत्या २६ तारखेला अमित शाह मुंबईत येणार आहेत. त्यावेळी शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपने राणे यांना प्रवेश दिल्यास शिवसेना काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
भाजपकडून १०५- १६५ असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र, शिवसेना अधिक जागांसाठी आग्रही आहे. शिवसेनेकडून समाधानकारक प्रस्ताव येत नसल्यामुळे भाजपही अडून बसला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने नमती भूमिका घेत शिवसेनेला अतिरिक्त जागा सोडली होती. तसेच कोकणातील नाणार प्रकल्पही रद्द केला होता. त्यामुळे आता शिवसेनेने राजकीय वस्तुस्थितीचा विचार करून भूमिका घ्यावी, अशी भाजपची अपेक्षा आहे.