कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईतील घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयावर अचानक धाड टाकली. या कार्यालयात अनधिकृत बांधकाम झाले आहे का, याची पाहणी करण्यात आली. याठिकाणी अनधिकृत बांधकाम आढळल्यास पालिकेकडून तात्काळ पाडकाम केले जाण्याची शक्यता आहे.
'कंगना राणौतला भाजपने राज्यसभेवर पाठवले तर नवल वाटायला नको'
तर दुसरीकडे ९ सप्टेंबरला कंगना राणौत मुंबईत येणार आहे. मी मुंबईत आल्यानंतर मला रोखून दाखवा, असे जाहीर आव्हान कंगनाने शिवसेनेला दिले आहे. त्यामुळे ९ तारखेला काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मात्र, मुंबई महानगरपालिका कंगनाला मुंबईत दाखल होताच होम क्वारंटाईन करण्याच्या तयारीत आहे. याबद्दल पालिकेकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. महापौर किशोरी पेडणेकर यांनीही याविषयी बोलण्यास नकार दिला आहे.
कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर पालिकेची धाड; अनधिकृत बांधकाम पाडण्याची शक्यता
परराज्यातून आलेल्या व्यक्तीला नियमानुसार होम क्वारंटाईन केले जाते. त्यामुळे कंगनाच्या हातावरही विमानतळावर उतरल्यानंतर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जाईल. येत्या दोन दिवसांत ICMRकडून क्वारंटाईन संदर्भात नवे नियम आल्यास त्यानुसार क्वारंटाईनची अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे यावर आता कंगना राणौत काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
यापूर्वी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेल्या बिहारमधील पोलीस अधिकारी विनय तिवारी यांना पालिकेने क्वारंटाईने केले होते. यावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकारमध्ये मोठा वादही रंगला होता. यापाठोपाठ आता शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरत असलेल्या कंगनालाही होम क्वारंटाईन केल्यास, काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.