देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : मुंबई शहरातील शेकडो नागरिक ज्या जुनाट इमारतींमध्ये राहतात. त्याच इमारती नागरिकांसाठी काळ बनू लागल्या आहेत. गेल्या सात वर्षांत इमारत दुर्घटनांमध्ये २३४ निष्पाप मुंबईकरांचा बळी गेला आहे.
पावसाळा आला की शेकडो मुंबईकरांच्या मनात धस्स होतं. पावसाळ्यात जीर्ण इमारती कधीही कोसळण्याची भीती असते. गेल्या सात वर्षांत एकही पावसाळा असा गेला नाही की ज्या पावसाळ्यात इमारत कोसळली नाही. गेल्या ७ वर्षांत मुंबईत २ हजार ७०४ बांधकामं कोसळली. या दुर्घटनांमध्ये २३४ निष्पाप मुंबईकरांचा बळी गेला. तर ८४० मुंबईकर जखमी झाले. मुंबईत इमारत कोसळली की जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर येतो.
२०१३ मध्ये १०१ लोकांचा मृत्यू झाला तर १८३ जण जखमी झाले.
२०१४ मध्ये २१ जणांचा मृत्यू झाला तर १२१ जण जखमी झाले.
२०१५ साली १५ जणांचा मृत्यू झाला तर १२० जण जखमी झाले.
२०१६ मध्ये २४ लोकांचा मृत्यू झाला तर १७१ लोकं जखमी झाले.
२०१७ मध्ये ६६ लोकांचा मृत्यू झाला तर १६५ जण जखमी झाले.
२०१८ मध्ये ०७ लोकांचा मृत्यू झाला तर १०० जण जखमी झाले.
इमारत धोकादायक असल्या तरीही मुंबईकरांना त्याच इमारतीत का राहावं लागतं याचा सगळ्याच राज्यकर्त्यांनी विचार करायला हवा... अन्यथा मुंबईत अशाच इमारती कोसळत राहतील आणि निष्पाप मुंबईकरांचा जीव जातच राहिल.