मुंबई : राज्यात पावसाळी कालावधीत १ जून २०१८ ते ३१ जुलै २०१८ दरम्यान सागरी मासेमारीवर बंदी घालण्यात आलेय. पावसाळी कालावधीत मासे आणि अन्य सागरी जीवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असते. त्यामुळे या कालावधीत कोणीही मासेमारी करु नये, असे आदेश जारी करण्यात आले आहे. जेणेकरुन मत्सउत्पादनाला बाधा पोहोचू नये, म्हणून बंदीची घोषणा राज्य आणि केंद्र शासनाच्यावतीने करण्यात आलेय.
मासे बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मत्स्यसाठ्याचे जतन व्हावे, खराब तसेच वादळी हवामानामुळे मच्छीमारांची जीवित आणि वित्त हानी यांपासून रक्षण करणे तसेच शाश्वत मच्छीमार व्यवस्थापनाच्या हेतूने १ जूनच्या शासन निर्णयानुसार तसेच केंद्र शासनाच्या २२ फेब्रुवारी २०१८ च्या आदेशानुसार ही मासेमारी बंदी घोषित करण्यात आली आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय आयुक्त अरुण विधळे यांनी दिली आहे.
१ जून ते ३१ जुलै या कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात आणि देशाच्या विशेष आर्थिक क्षेत्रापर्यंत (इइझेड) मासेमारी बंदी घोषित करण्यात आली आहे, मच्छीमाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.