मुंबई: वैमानिकांच्या कमतरतेमुळे मंगळवारी इंडिगोला ३० हवाई फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. तसेच कंपनीकडून प्रवाशांना शेवटच्या क्षणी चढ्या दरात तिकीटे खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे. गुरुग्राम येथील इंडिगोच्या मुख्यालयातून सोमवारीच ३२ विमानांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही हवाई वाहतूक मंत्रालयाने इंडिगोविरुद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही. शनिवारपासून हा सगळा गोंधळ सुरु आहे. रद्द करण्यात आलेल्या फेऱ्यांमध्ये कोलकाता विमानतळावरील ८, हैदराबादमधील ५ , बंगळुरू व चेन्नईमधील प्रत्येकी चार फेऱ्यांचा समावेश आहे. नियोजित फेऱ्या रद्द झाल्यानंतर प्रवाशांना चढ्या दरात तिकीटे खरेदी करावी लागत आहेत. तसेच विमानांच्या वेळा बदलल्यामुळे प्रवासासाठी वेळ लागत असल्याची तक्रारही अनेकांनी केली. मात्र, यावर इंडिगो प्रशासन किंवा नागरी उड्डाण मंत्रालयाकडून कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.
मात्र, रविवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात इंडिगोने विमानांच्या फेऱ्या रद्द होण्यासाठी खराब हवामानाचे कारण दिले. तसेच कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक पूर्ववत करण्यासाठी थोडा वेळ लागत आहे. त्यामुळे विमानांच्या काही फेऱ्या रद्द कराव्या लागल्या, असे त्रोटक स्पष्टीकरण इंडिगोकडून देण्यात आले.