मुंबई : देवेंद्र फडणवीस यांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाल्याबद्दल जयंत पाटील यांनी त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री म्हणून मागच्या 5 वर्षात केलेल्या कामाचं कौतुकही केलं.
जयंत पाटील यांनी म्हटलं की, 'सभागृहात बोलणं सोपं असतं. पण राज्य पुढे नेण्याचा प्रयत्न करणं वेगळं असतं. पंतप्रधान मोदींचं देखील कौतुक करतो. महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होण्याआधीच गडकरी यांनी म्हटलं होतं की, आमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील. फडणवीसांनी अनेक ठिकाणी कामं केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत तुम्ही काम केलं आहे. याचा चांगला परिणाम तुमच्यावर झाला आहे. याचा अनुभव आम्ही घेतला आहे.'
'वॉर्ड अध्यक्ष म्हणून त्यांनी काम सुरु केलं. त्यानंतर प्रसिद्धी प्रमुख म्हणून तुम्ही काम केलं. त्याचा फायदा गेल्या ५ वर्षात तुमच्या पक्षाला झाला. आम्हाला हे जमलंच नाही. प्रसिद्धीसाठी आम्ही पृथ्वीराज चव्हाणांकडे फंड मागितला, पण आम्हाला तो मिळालाच नाही. महाराष्ट्राच्या जनतेने महापौर बनलेल्या व्यक्तीला विरोधीपक्ष नेता केलं. ते उत्कृष्ठ वक्ते, उत्कृष्ठ संसदपटू म्हणून त्यांचा सत्कार झाला. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. रात्री उशिरा म्हणून ते काम करायचे. निवडून आल्यावर पहिल्या रांगेत बसेल असं मी म्हटलं होतं. कुठे हे माहित नव्हतं. तसंच फडणवीसांनी देखील म्हंटलं होतं की, मी परत येईल. पण कुठे हे त्यांनी सांगितलं नव्हतं.' असं ही जयंत पाटील म्हणाले.
'आपला आक्रमकपणा हा विरोधीपक्ष नेतेपदासाठी होता. हे काल दिसलं. जागेवर बसून आपलं सैन्य महाराष्ट्राच्या प्रश्नाला सामोरं जाईल. आपल्यात सतसतविवेक बुद्धी आहे. हे आम्हाला माहित आहे. आपण कायम स्वरुपी विरोधीपक्ष नेते राहा असं आम्ही बोलणार नाही. जनतेच्या मार्फत परत तुम्ही या ठिकाणी याल. पण पुढील ५ वर्ष तुम्ही तेथेच बसा. ५ वर्ष तुम्ही विरोधीपक्ष नेत्याचं काम उत्तमपणे करा. यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. शरद पवारांपासून अनेकांनी विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलं. याचा अनुभव तुम्हाला कामी येईल. या पदाला फार मोठा मान आहे. इतरांची गॅरंटी घेऊ शकत नाही. पण तुमची गॅरंटी आहे. तुम्ही या पदाला न्याय द्याल. मैत्री आपण अशीच कामय ठेवा.'