Loksabha 2024 : मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) नेमकी काय घोषणा करणार, याची उत्सूकता तमाम महाराष्ट्राला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणारा मनसेचा (MNS) हा गुढीपाडवा खास आहे. कारण या मेळाव्याआधी पडद्याआड बरंच काही राजकारण घडलंय. राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. तेव्हापासूनच मनसे महायुतीत (Mahayuti) सामील होणार, राज ठाकरेंच्या हातात शिवसेना येणार, मनसेचे उमेदवार धनुष्यबाणावर लढणार इथपर्यंत तर्क लढवले गेले. मात्र त्याला दोन आठवडे उलटले तरी पुढं काहीच घडलं नाही. मनसेच्या आघाडीवर चिडीचूप शांतता आहे. बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली, काय वचनं दिली, हे काहीच समजू शकलेलं नाही. दरम्यान, मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) दिलेत..
देवेंद्र फडणवीस यांनी दिले संकेत
मनसे महायुतीत सहभागी होण्याबाबत फडणवीसांनी संकेत दिलेयत. मनसे सोबत चर्चा गेल्या काही काळात झाल्या आहे. मनसेने जेव्हापासून हिंदुत्वाचा अजेंडा स्वीकारला आहे, तेव्हापासून आमची त्यांच्याशी जवळीक वाढली आहे... राज ठाकरे यांनी 2014 पासूनच मोदींना पाठिंबा दर्शवला होता. मोदींना पंतप्रधान केलं पाहिजे अशी जाहीर भूमिका ही घेतली होती. मधल्या काळात त्यांची भूमिका जरी बदलली होती, तरी आज त्यांना ही हे मान्य आहे की मोदींनी भारताचा विकास केला आहे... अशा परिस्थितीत सर्वांनी मोदींच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे.. खास करून जे राष्ट्रीय विचाराने प्रेरित आहे, ज्यांच्यासाठी समाज व राष्ट्र प्रथम आहे अशा सर्वांनी मोदींसोबत राहिले पाहिजे. म्हणून मला विश्वास आहे की राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुती सोबत राहील असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मनसे महायुतीत सामील झाली तर त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतात ते पाहुयात..
महायुतीत नवे ठाकरे आले तर...
राज ठाकरेंच्या रुपानं चौथा भिडू महायुतीत आल्यास लोकसभा निवडणुकीची गणितं बदलू शकतात. मनसे सोबत आल्यास मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर याठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना फायदा होऊ शकतो, असा अंदाज आहे. लोकसभेसह विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत मनसेमुळे महायुती बळकट होईल.
नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, अशी भूमिका सर्वात आधी 2011 साली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीच मांडली होती. त्यानंतर ती आपली चूक होती, असंही त्यांनी जाहीर केलं. आता पुन्हा एकदा हिंदू जननायक राज ठाकरे आणि भाजप नेत्यांमधली जवळीक वाढू लागलीय.दरम्यान, उद्धव ठाकरे भाजपपासून दूर झाल्यानं राज ठाकरेंच्या रुपानं नवा ठाकरे महायुतीत येणार का? मनसे भाजपला पाठिंबा देणार की लोकसभा निवडणुकीत अलिप्त राहणार? या सा-या प्रश्नांची उत्तरं गुढीपाडव्याच्या सभेत मिळणारायत.