मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महिला मतदारांसाठी स्वतंत्र मतदार केंद्र उभारण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे पोलिसांपासून ते निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत सर्व कर्मचारी महिलाच असणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत सूचना केली होती. अधिकाधिक महिलांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी 'सखी मतदान केंद्रा'ची संकल्पना पुढे आली आहे. राजस्थान, गोवा या ठिकाणी प्रयोगिक तत्त्वावर हे करण्यात आले होते. आता महाराष्ट्रातही बहुतांश मतदार संघांमध्ये अशी महिला विशेष मतदान केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत महिलांसाठी "स्वतंत्र सखी मतदान केंद्र" हा अभिनव प्रयोग राबविण्यात येत आहे. महिला आणि युवतींचा मतदानासाठी सहभाग वाढावा यासाठी निवडणूक आयोगाकडून खास केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. सखी आणि गुलाबी असे नाव या केंद्राना देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रक्रिया सुरु झाली असून मतदान अधिकारी या महिलाच असणार आहे. मतदान प्रक्रीया कशी असते, याचे प्रशिक्षणही महिलांना देण्यात येत आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात हा प्रयोग राबविण्यात येत आहे. सहा मतदारसंघात सहा केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. हा पहिलाच प्रयोग आहे.