मुंबई : मी काट्याप्रमाणे मुंबई काँग्रेसमध्ये होतो. तो काटा आज दूर झाला आहे, त्यामुळे काही लोकांचे दुखणे बरे होईल असा टोला मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी पक्षातीलच नेत्यांना लगावला आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतर संजय निरुपम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मिलिंद देवरा यांनी आज मावळते अध्यक्ष संजय निरुपम यांच्याकडून अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या काही दिवस आधीच संजय निरूपम यांना डच्चू देऊन त्यांच्याजागी माजी खासदार मिलिंद देवरा यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संजय निरुपम हे नेहमी वादग्रस्त विधान करण्यासाठी चर्चेत असायचे. त्यांना पक्षातूनही टोकाचा विरोध होता. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर हाय कमांडने त्यांना पदावरून पायउतार केले.
मला चार वर्ष सहकार्य करणार्यांचे आभार तसेच चार वर्ष असहकार्याचे वातावरण निर्माण केले त्यांचेही आभार असे संजय निरुपम म्हणाले. यावेळी त्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्यावरही भाष्य केले. देवरा हे माझे मित्र आहेत, त्यांच्याशी माझे काही मतभेद नाहीत आणि नव्हते हे त्यांनी स्पष्ट केले. मिलिंद देवरा यांनी देखील अध्यक्ष पदाची सुत्र हाती घेतल्यावर निरुपम यांच्या सोबत मैत्रीचे संबंध असल्याचे म्हटले होते. राहुल आणि सोनिया गांधी यांनी त्यांची नियुक्ती केली आहे, ती सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे आपल्याकडे एक महिना आहे, मुंबईतील सहाच्या सहा जागा जिंकण्यासाठी आपण सर्वांनी दिवसरात्र मेहनत केली पाहिजे असे आवाहन निरुपम यांनी केले.
उत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी आम्ही राहुल गांधी यांच्याकडे केल्याचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा म्हणाले. संजय निरुपम यांनी सांगितले की हे पद काटेरी मुकुट आहे. मलाही एक दिवस हे पद दुसर्याला द्यावे लागेल. काँग्रेस पक्षाला आक्रमक संघटना म्हणून मुंबईत ओळखले जाऊ लागले त्याचे श्रेय मी निरुपम यांना देतो असे निरुपमांविषयी त्यांनी कौतुकोद्गारही काढले.
मुरली देवरा आणि गुरुदास कामत यांचे आशिर्वाद मला लाभतील. मुरली देवरा यांनी 43 व्या वर्षी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले होते. मी 42 व्या वर्षी हे पद स्वीकारत आहे. मात्र मुरली देवरांप्रमाणे 22 वर्ष मी हे पद सांभाळू शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. नाराजी दाखवण्याची ही वेळ नाही. तुम्ही उमेदवाराबद्दल, स्थानिक नेत्याशी नाराज असलात तर ती नाराजी आज बाहेर ठेवा. आपल्याला कोपऱ्यात फेकलं गेलंय असं ज्यांना वाटतंय अशा सर्वांशी मी चर्चा करणार असल्याचे देवरा म्हणाले. 30 एप्रिल नंतर मी तुमच्या समस्या दूर करेन. मुरली देवरा आणि माझ्या स्वभावात फरक आहे. पक्षात बेशिस्ती मी खपवून घेणार नाही असे म्हणत त्यांनी उपस्थितांचे कानही टोचले. दरम्यान गोरेगावला सभेसाठी जायचे सांगून मिलिंद देवरा यांचे भाषण अर्ध्यावर आले असताना संजय निरुपम निघून गेले. निरुपमांच्या अचानक जाण्याने मुंबई काँग्रेसच्या अंतर्गत वादाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.