मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांवर महामंडळाच्या पदांची खैरात करण्यात आलीय. शिवसेनेच्या महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना महामंडळांचं अध्यक्षपद, उपाध्यक्षपदं आणि सदस्यपदं देण्यात आलीयत. त्यामध्ये शिवसेनेच्या शैलेश फणसे, भाऊ कोरगांवकर, अरुण दुधवडकर, नामदेव भगत, गोपाळ लांडगेंसह युवासेनेच्या पवन जाधव आणि अनेक महिला कार्यकर्त्यांना सदस्यपदं देण्यात आली आहेत. अनेकांना पदं देऊन ताकद देण्यात आलीय. तर काहींना गप्प राहण्यासाठी आमिष देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
महामंडळाच्या नियुक्त्या जाहीर करताना उद्धव ठाकरेंनी जालन्यातल्या शिवसैनिकांवर विशेष लक्ष दिल्याचं दिसून येतंय. दानवे आणि खोतकर वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना शांत करण्यासाठी महामंडळांच्या पदांची खैरात करण्यात आलीय. शिवसेनेच्या चार नेत्यांची महामंडळावर नियुक्ती करण्यात आलीय. शिवसेनेचे बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलीय. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांची राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक असलेल्या सविता किवंडे यांची महात्मा फुले विकास मंडळाच्या सदस्यपदी तर शिवसेनेचे उपनेते असलेले लक्ष्मण वडले यांची महाराष्ट्र ऐॅग्रीकल्चर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंटच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलीय. या नियुक्त्यांमुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर वित्त आणि विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डेवलपमेंट कॉर्पोरेशन , वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, मुंबई, म्हाडा प्राधिकरण, इमारत व दुरुस्ती पुनर्नरचना मंडळ, मुंबई गृहनिर्माण वभक्षेत्रविकास मंडळ, म्हाडा नाशिक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र स्टेट हॅन्डीकॅप फायनान्स ऍन्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अशा एकूण तब्बल ३६ महामंडळवरील सदस्यांच्या नेमणुका जाहीर करण्यात आल्या आहेत.