मुंबई: राज्यभरात धनगर समाजाचं आंदोलन सुरु असताना पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री आणि धनगर समाजाचे नेते महादेव जानकरांनी धीर धरण्याचा आग्रह धरला आहे. सरकारची भूमिका धनगर समाजाला आरक्षण देण्याचीच आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेचा अहवाल आल्यानंतर कोणत्याही त्रुटीशिवाय आरक्षण मिळेल, असा दावा जानकरांनी केला. तसेच आरक्षणच्या मागणीसाठी कोणी आत्महत्या करू नये, असे आवाहनही जानकरांनी केले.
राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका उडाला असतानाच धनगर समाजही सरकारच्याविरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. आरक्षणाचा मुद्दा लावून धरण्यासाठी विविध ठिकाणी धनगर समाजाने मोर्चे, सभांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा संघटनांप्रमाणे धनगर समाजाच्या संघटनांमध्ये एकवाक्यता नाहीये. त्यामुळे समजाच्या विविध नेत्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्रपणे आंदोलन केले जात आहे.