'...हा देशाच्या पंतप्रधानांचा आवडता छंदच बनला आहे'; उद्धव ठाकरेंचं विधान

Maharashtra Assembly Election 2024: "महाराष्ट्रासारखे प्रगत आणि सुजलाम् सुफलाम् राज्य दिवाळखोरीत गेले. त्यामुळे घराघरांत दिवाळी साजरी होत आहे ती कर्ज काढून," असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 31, 2024, 08:03 AM IST
'...हा देशाच्या पंतप्रधानांचा आवडता छंदच बनला आहे'; उद्धव ठाकरेंचं विधान title=
ठाकरेंनी मोदींवर साधला निशाणा

Maharashtra Assembly Election 2024: "दिवाळी आनंदात साजरी करायची की अंधारात, हे यापुढे श्रीमंत अदानी महाराज ठरवतील. कारण मोदी-शहा आल्यापासून सर्व प्रकारच्या लक्ष्मीपूजनाचा मान फक्त त्यांनाच मिळत आहे," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी 'सामना'च्या दिवळी अंकातून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र लुटणा-या मिंधे आणि त्यांच्या दिल्लीतील 'शाहयां'चा पराभव करावाच लागेल, असंही ठाकरेंनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हटलं आहे. "महाराष्ट्रासारखे प्रगत आणि सुजलाम् सुफलाम् राज्य दिवाळखोरीत गेले. त्यामुळे घराघरांत दिवाळी साजरी होत आहे ती कर्ज काढून," असं ठाकरेंनी म्हटलं आहे.

मोदी 75 वर्षांचे होतील...

"मोदी 17 सप्टेंबर 2025 रोजी 75 वर्षाचे होतील व ते ठरल्याप्रमाणे निवृत्त होतील अशी वेडी आशा काही देशभक्तांनी धरली आहे. त्यामुळे मोदी गेलेच तर पंत जाऊन कोणते राव त्या पदावर चढतील व देशाला हुकूमशाहीच्या जाचातून मुक्त करतील तेच पाहायचे आहे," असंही ठाकरेंनी म्हटलं आहे. 

मोदी यांनी सत्ता स्थापन केली, पण...

"लोकसभा निवडणुकांत जनतेने मोदींचे विमान जमिनीवर आणले. चारशे पार जागा जिंकून देशाचे संविधान बदलण्याचा त्यांचा इरादा होता. चारशे पार या अहंकाराच्या फुग्यास टाचणी लावली ती महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या दोन राज्यांनी. या दोन्ही राज्यांतील जनता शहाणपणाने वागली व त्याच शहाणपणाने मतदान करून मोदींच्या बहुमताचा घोडा अडवला. मोदी यांनी सत्ता स्थापन केली, पण दोन 'सेक्युलर' म्हणवून घेणाऱ्या नेत्यांच्या कुबड्यांवर ते राज्य करीत आहेत," असा टोलाही ठाकरेंनी लगावला आहे.

हिंदू-मुसलमानांत फूट पाडून...

"मोदींसारख्या विश्वगुरूने कुबड्यांचा आधार घेत राज्य करणे त्यांच्या इभ्रतीस शोभत नाही. पण सेक्युलर कुबड्यांवर लटकत त्यांच्या हिंदुत्वाच्या गर्जना सुरूच आहेत. पंतप्रधान हे एका जातीधर्माचे नसतात. ते देशाचे व अखिल समाजाचे असतात. पण हिंदू-मुसलमानांत फूट पाडून गोंधळ निर्माण करणे हा देशाच्या पंतप्रधानांचा आवडता छंदच बनला आहे," अशी टीका ठाकरेंनी केली आहे.

नक्की वाचा >> '175 कोटींचा आरसा', ठाकरेंच्या शिवसेनेचा निशाणा; म्हणाले, 'महाराष्ट्राच्या बोकांडी...'

मोदी यांना हिटलरचा मार्गही धडपणे जमला नाही

"मोदी हे जर हिटलरचा मार्ग स्वीकारत असतील तर त्यांना तेही धडपणे जमलेले नाही. फार थोड्या वर्षांत हिटलरने जर्मनीला अफाट सामर्थ्य दिले. त्याची कर्तबगारी विलक्षण होती! पण हिटलरला एक गोष्ट कधीच समजली नाही. कुठे थांबावे ते त्याला समजले नाही! त्यामुळे त्याने स्वतः बरोबर जगाचाही विध्वंस करून घेतला. माणसाचे मोजमाप त्याच्या उद्दिष्टावरून आणि कर्तबगारीवरून केले जाते," असं ठाकरे म्हणालेत.

नक्की वाचा >> शिंदे, ठाकरे, BJP ला एकाच वेळी नडणारे सरवणकर किती श्रीमंत? 28 लाखांची कार, 2 फ्लॅट्स अन् एकूण संपत्ती...

विधानसभा निवडणुकांचे मैदान मारुन...

"'चारशे पार' च्या वखवखत्या दौडबाजीस महाराष्ट्राने लगाम घातला. महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशा दाखवत आला. आता विधानसभा निवडणुकांचे मैदान जवळच आहे. हे मैदान मारून महाराष्ट्र लुटणाऱ्या मिंधे व त्यांच्या दिल्लीतील 'शाह्यां' चा पराभव करावाच लागेल," असं ठाकरेंनी मनोगताच्या शेवटी म्हटलं आहे.