मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी कोरोना व्हायरसने पुन्हा डोकं वर काढलं आहे, परिस्थितीत हाताबाहेर जावू नये म्हणून काही निर्णय हे अटळ असल्याचं सांगत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही गोष्टींवर राज्यात २२ फेब्रुवारी २०२१ पासून धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांवर बंदी घातल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते, तेव्हा त्यांनी ही घोषणा केली, या घोषणेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, 22 फेब्रुवारी २०२१ पासून सर्व धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांना राज्यात बंदी लावण्यात आली आहे.
ही लाट आहे की नाही, हे येत्या ८ ते १५ दिवसात समजेल असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. अर्थातच रुग्णसंख्यावाढीने आणखी वेग घेतला तर ही दुसरी लाट आहे की नाही हे स्पष्ट होईल. दुसरी लाट अधिक भयानक असेल असं भाकित अनेकांनी वर्तवल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल पुढील ८ ते १५ दिवस अधिक गंभीरतेने घेण्याची गरज आहे.
दुसऱ्या लाटेने दारावर धक्का दिला आहे, तेव्हा मास्क वापराच. नियम पाळा, नाहीतर काही गोष्टी अटळ आहेत. या दरम्यान विकासकामं थांबणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे, आतापर्यंत ५३ हजार अॅक्टिव्ह रुग्णसंख्या झाली आहे. मंत्रिमंडळातील काही सदस्य देखील कोरोनाने बाधित आहेत. तेव्हा कृपया हे गंभीरतेने घ्या असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला केलं आहे.
मुख्यमंत्री आज लॉकडाऊनची घोषणा करतील अशी शक्यता वर्तवली जात होती, पण यासंबंधित विषयावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे, लॉकडाऊन नको असेल, तर मास्क लावा, हात धुवा, आणि सामाजिक अंतर पाळा, हे एवढंच तुम्ही केलं तर खूप काही आहे, कारण पुन्हा सर्वांना घरात थांबून राहायला आवडणार नाही.
काही ठिकाणी बंधनं नक्कीच पाळावी लागतील, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी बंधनं पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, ही वेळ सर्वांवर येऊ नये ही अपेक्षा असेल, तर मास्क लावा, मास्क हीच ढाल असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.