कल्याण: लॉकडाऊन असताना पोलिसांना चुकवण्याच्या नादात कल्याणमध्ये एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गणेश गुप्ता असे या व्यक्तीचे नाव असून ते खडकपाडा या परिसरात वास्तव्याला होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश गुप्ता गुरुवारी सकाळी धान्य घेऊन सायकलवरून आपल्या घरी जात होते. त्यावेळी रस्त्यात पोलिसांकडून तपासणी सुरु असल्याचे पाहून गणेश गुप्ता गांगरले. पोलिसांना चुकवण्यासाठी त्यांनी आपली सायकल जवळच्या एका गल्लीत वळवली. मात्र, तेव्हा त्या गल्लीतील नागरिकांनी तुम्ही लॉकडाऊन असताना येथे का आलात?, असा प्रश्न गुप्ता यांना विचारला. काही लोकांनी त्यांना घेरले होते.
मास्क न घालता रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना शिकवली चांगलीच अद्दल
त्यामुळे गुप्ता पटकन सायकल घेऊन तिथून निघण्याच्या प्रयत्नात होते. या नादात ते सायकलसह गटारात पडले. यावेळी त्यांच्या डोक्याला इजा झाली. मात्र, गुप्ता यांनी गटारातून बाहेर येत स्वत:ला साफ केले आणि त्यानंतर ते घरी परतले.घरी परतल्यानंतर दोन तासांनी गणेश गुप्ता यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांचे डोक्यात प्रचंड वेदना जाणवू लागल्या. तेव्हा गुप्ता यांच्या भावाने त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत गणेश गुप्ता यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती पोलीस अधिकारी सुखदा नारकर यांनी दिली.
Lockdown : एकविरा देवीचा गड कचरामुक्त
या घटनेनंतर पोलिसांनी गुप्ता यांच्या निधनाची नोंद अपघाती मृत्यू म्हणून केली आहे. मात्र, तरीही पोलीस त्यांच्या शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. गुप्ता यांचा मृत्यू गटारात पडल्यामुळे झाला की कोणी त्यांच्या डोक्यावर मारले, हे अहवालातून स्पष्ट होईल. याशिवाय, पोलीस या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत. या फुटेजमध्ये स्थानिक रहिवाशांनी गुप्ता यांना घेरल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे पोलीस याप्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.