Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. भाजपनेच (BJP) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर करत तसे संकेत दिले आहेत. 'महाराष्ट्राच्या निवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन' अशा आशयाचा देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadanvis) व्हिडिओ भाजप महाराष्ट्राच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री (Maharashtra CM) होणार अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत दौरा करत वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीसाटी भाजपची ही नवी रणनिती असल्याचंही बोललं जात आहे.
काय आहे व्हिडिओत?
भाजप महाराष्ट्रच्या ट्विटर हँडलवर देवेंद्र फडणवीस यांचा फोटो वापरत त्यावर 'महाराष्ट्राच्या निवनिर्मितीसाठी मी...' असं वाक्य लिहिण्यात आलं आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ टाकण्यात आला आहे. या व्हिडिओत 'मी पुन्हा येईन' या देवेंद्र फडणवीसाच्या वाक्याचा संदर्भ देण्यात आला आहे.
'शेवटी एवढंच सांगतो मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन याच निर्धाराने, याच भूमिकेत, याच ठिकाणी नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईन गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी...'
राज्यात सत्ताबदल होणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच शिंदे गटातल्या एकूण 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरु आहे. या प्रकरणी लवकरच निकाल लागणं अपेक्षित आहे. त्यामुळे राज्यात सत्ताबदल होणार असल्याच्याही चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आली असल्याची चर्चा सुरु असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडिओने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी "मी पुन्हा येईन!" या त्यांच्या ट्रेडमार्क वाक्याचा पुनरुच्चार करत हा व्हिडिओ बनवण्यात आलाय. परिणामी येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
या व्हिडिओमुळे एकनाथ शिंदे यांच्याऐवजी मुख्यमंत्रीपदाची धुरा पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार का, याची उत्सुकता आता सगळ्यांना लागली आहे.