शिवसेना, राष्ट्रवादी आणि आता काँग्रेस फुटणार, अशोक चव्हाणांबरोबर हे आमदार बाहेर पडणार?

Maharashtra Politics : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी पक्षीय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण भाजपात प्रवेश  करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला हा मोठा धक्का आहे. 

राजीव कासले | Updated: Feb 12, 2024, 04:26 PM IST
शिवसेना, राष्ट्रवादी आणि आता काँग्रेस फुटणार, अशोक चव्हाणांबरोबर हे आमदार बाहेर पडणार? title=

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि आता काँग्रेस (Congress) फुटली आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. अशोक चव्हाण यांनी पक्षीय सदस्यत्वाचा राजीनामा (Resignation) दिल आहे. त्याआधी त  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची अशोक चव्हाणांनी भेट घेतली.  दुपारी पुन्हा अशोक चव्हाण नार्वेकरांची भेट घेणार आहेत, याच भेटीत ते आमदारकीचा राजीनामा देतील असं समजतंय.  केंद्रीय भाजप नेतृत्वाच्या उपस्थितीत चव्हाणांचा भाजप प्रवेश होईल अशी शक्यता वर्तवली जातेय. दुसरीकडे भाजप प्रदेश कार्यालयात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचा एक गट फुटणार, अशोक चव्हाण नाराज आहेत अशा विविध चर्चा सुरु होत्या. त्याच पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण-राहुल नार्वेकर भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय. काँग्रेसमध्ये पडद्यामागे काही मोठ्या हालचाली होत नाहीयेत ना या चर्चांना उधाण आलंय.

अशोक चव्हाणांबरोबर हे आमदारही काँग्रेस सोडणार?
अशोक चव्हाण यांच्याबरोबर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माधवराव जवळगावकर, अमित झनक, संग्राम थोपटे, विश्वजित कदम, अमित देशमुख, चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान हे देखील काँग्रेस सोडणार असल्याची जोरदार चर्चा आहे. नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर अशोक चव्हाण आणि त्यांचे समर्थक नाराज असल्याचं बोललं जात आहे. अशोक चव्हाण आणि काही आमदार नॉट रिचेबल आहेत. अशोक चव्हाण यांना भाजप राज्यसभेवर पाठवणार असल्याचीही चर्चा आहे. गेले दोन दिवस अशोक चव्हाण हे दिल्लीत होते. यावेळी त्यांनी दिल्लीतल्या भाजपाच्या श्रेष्ठींची भेट घेतली. 

देवेंद्र फडणवीस यांचा सूचक वक्तव्य
काँग्रेसमध्ये जनाधार असलेल्या नेत्यांची काँग्रेसमध्ये घुसमट होत आहे. त्यामुळे हे नेते भाजपात येण्याच्या तयारीत असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. मात्र अशोक चव्हाणांबाबत बोलताना हे मीडियातूनच कळलं असल्याचा मिश्कील टोलाही त्यांनी दिला.  आगे आगे देखो होता है क्या असं सांगत राज्याच्या राजकारणातली उत्सुकता आणखीनच वाढवलीय. 

हे ही वाचा : महाराष्ट्रात राजकीय भूकंप! अशोक चव्हाणांचा काँग्रेसमधून राजीनामा

शोक चव्हाण यांचा राजकीय प्रवास
अशोक चव्हाण हे महाराष्ट्रातल्या राजकारणातील मोठं नाव आहे. मराठवाड्यातील काँग्रेसचा ते चेहरा आहेत. नांदेड जिल्ह्यातील राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहेत. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तर अशोक चव्हाण यांनीही राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. 2008 मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला हता. त्यानंतर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आली.