मुंबई : विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. या आठवड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते भाजप आणि शिवसेनेत दाखल होणार आहेत. आज राष्ट्रवादीचे श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे शिवसेनेत प्रवेश करत आहेत. तर राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव १३ तारखेला शिवसेनेत दाखल होतील. राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतील नेते गणेश नाईक यांचा येत्या बुधवारी भाजपात प्रवेश होत आहे.
राष्ट्रवादीसाठी हे आणखी काही मोठे धक्के असून आता अशा धक्क्यांची राष्ट्रवादीला जणू सवय झाली आहे. याशिवाय इतर काही नेत्यांचा प्रवेश शिवसेना, भाजपात होण्याची शक्यता आहे. मात्र हा प्रवेश होणार का अथवा कधी होणार याबाबत सध्या तरी अनिश्चितता आहे. यात छगन भुजबळ, आमदार रामराजे निंबाळकर या नेत्यांचा समावेश आहे. तर उदयनराजे भोसले यांनी पुढची वाटचाल ठरवण्यासाठी पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे.
याआधी शिवेंद्रराजे भोसले, सचिन अहिर, संदीप नाईक, राणाजगजीत सिंह, चित्रा वाघ, धनंजय महाडिक, दिलीप सोपल, मधुकर पिचड आणि त्यांचा मुलगा वैभव पिचड, विजयसिंग मोहिते पाटील यांचा मुलगा रणजीत सिंग मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.