मुंबई : काँग्रेस आणि भाजपवर आपला विश्वास नाही. त्यांनी मुस्लमांनाचे खूप मोठे नुकसान केले आहे. नेहमी अन्याय केला आहे. त्यामुळे मोदी सरकार आणि काँग्रेसला धडा शिकवण्याची ही शेवटची संधी आहे, असे म्हणत मतदारांना वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्याचे आवाहन एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी येथे केले. पुलवामा दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानच जबाबदार आहे. मसूद अजहर मौलाना नाही, तर तो सैतान आहे, असा हल्लाबोल केला. पाकिस्तानला यावेळी ओवेसी यांनी इशारा दिला. भारतातील मुस्लमानांची काळजी करु नका, तुमच्या धमक्या पायाखाली आम्ही घालतो. भारत देश एक आहे आणि यातच आमची एकता टिकून आहे, असे ओवेसी म्हणालेत. दरम्यान, पुलवामा हल्ला हा मोदी सरकारचे सर्वात मोठे अपयश आहे, असे ते म्हणालेत.
शिवाजी पार्क मैदानात वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. ओबीसींच्या सन्मानार्थ या परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ओवेसी यांनी भाजप, मोदी, शरद पवार, राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. मोदी, शरद पवार, ठाकरे, फडणवीस, हे सगळे पेशवा आहे, असे ते म्हणालेत. नाही नाही म्हणत ठाकरेंनी युती केली. ते होणारच होते. त्यांचा दिखावूपणा दिसून आला. तुम्ही कोणाला घाबरु नका, तुमच्यावर अन्याय झाला आहे. आज येथे तुम्ही वेळ काढून आला आहात, ते कशासाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे यांच्याकडे खूप पैसा आहे. आपल्याकडे पैसा नाही. त्यामुळे तुमची ताकद येथे जशी दाखवलीत तशीच निवडणुकीत दाखवून प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारांना निवडून दाखवा, असे आवाहन ओवेसी यांनी केले. या सभेसाठी शिवाजी पार्कवर मोठी गर्दी जमली होती. यातून वंचित बहुजन आघाडीचं विराट शक्तिप्रदर्शन दिसून आले. या सभेला वंचित भटके, ओबीसी, आदिवासी, कोळी, आगरी समाजाच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 'अब की बार ना मोदी, ना राहुल अब की बार सिर्फ प्रकाश आंबेडकर' असा नारा ओवेसींनी दिला. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-शिवसेना या दोन्ही प्रस्थापित आघाड्यांना बाळासाहेब अर्थात प्रकाश आंबेडकर यांनी पर्याय उभा केला आहे. हीच शेवटची संधी आहे. ही संधी पुन्हा येणार नाही. त्यामुळे तुम्हाला परिवर्तन करावयाचे आहे तर प्रकाश आंबेडकर यांच्याच उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले.
पुलवामा हल्ला झाला ते मोदी सरकारचे मोठे अपयश आहे. २०० किलो आरडीएक्स भारतात कसे आले ? याचा सुद्धा फोटोसेशनमधून वेळ मिळाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचार करावा. हे आपल्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश नाही का ? असा सवाल त्यांनी केला. मसूद अजहरवर आंतरराष्ट्रीय निर्बंध आणण्यात चीनने खोडा घातला. तुम्हीच चीनच्या राष्ट्राध्यक्षांना झोपाळयावर बसवलेत. त्यांना मिठी मारलीत. वुहानमध्ये परिषद घेतलीत हे तुमचे राजनैतिक अपयश आहे, अशी टीका त्यांनी मोदींवर केली. देश प्रश्न विचारतोय. मोदी तुम्हाला उत्तर द्यावे लागेल. मॉब लिचिंग होते तेव्हा तुम्ही गप्प बसता नंतर सात-आठ दिवसांनी बोलता. मोदी तुम्ही १८० वर्ष जगा आम्ही प्रार्थना करतो. तुमची माणसं सुद्धा हे बोलणार नाहीत, असे ओवेसी म्हणाले.