मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १ लाख ७० हजार कोटीचे आर्थिक पॅकेज जाहीर करून आपली जबाबदारी पार पाडली. आता मदत करण्याची वेळ उद्धव ठाकरे यांची आहे, असे वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले. तसेच बाळा नांदगावरकर यांनी केंद्र सरकारचे आभारही मानले. गरिबांच्या जनधन खात्यात सहा हजार रुपये जमा करावेत, अशी मनसेची मागणी होती. केंद्र सरकारने आज १ लाख ७० हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले.
आता मदत करण्याची वेळ राज्य सरकारची आहे. राज्य सरकारने गरिबांच्या जनधन खात्यात तीन हजार रुपये जमा करावेत, अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली. तसेच शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेलाही नांदगावकर यांनी मदत करण्याचे आवाहन केले आहे. मुंबई महानगरपालिका देशातील श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक आहे. त्यामुळे त्यांनी मदतीसाठी पुढाकार घ्यायला हवा. उद्धव ठाकरे 'हीच ती वेळ' असं म्हणाले होते. त्यामुळे आता त्यांनी राज्यातील नागरिकांना मदत करावी.
तसेच शिर्डी, सिद्धिविनायक मंदिर यासह राज्यातील श्रीमंत देवस्थानांनी मदतीसाठी आपली तिजोरी खुली करावी, असे आवाहनही बाळा नांदगावकर यांनी केले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पत्रकापरिषद घेऊन आर्थिक पॅकेज जाहीर केले. यामध्ये शेतकरी, बांधकाम मजूर, रोजंदारीवर काम करणारे मजूर, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी अशा सर्वांसाठी केंद्र सरकारने उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार सरकारने स्वच्छता कर्मचारी आणि आरोग्य सेवकांना ५० लाखांचा विमा घोषित केला आहे. तर पंतप्रधान किसान योजनेसाठी सरकारने १५ हजार कोटी मंजूर केले आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रूपये जमा केले जाणार आहेत.