कल्याण : कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. आज कल्याण डोंबिवलींमध्ये कोरोनाचे ६ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे याठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सहा नव्या रुग्णांमध्ये कल्याण पश्चिमेतील एकाला तर कल्याण पूर्वेतील एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यानंतर डोंबिवली पश्चिमेतील ३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, शिवाय कल्याण जवळ असलेल्या अंबिवली भागात राहणाऱ्या एका मुंबई पोलीस शिपायाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. याठिकाणी रुग्णांचा सतत आकडा वाढत असला तरी नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याचं चित्र दिसत आहे.
कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या आता ११४ वर गेली आहे. कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता शहरामध्येच तपासणी करण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी या प्रयोगशाळेस निधी देण्यास मंजुरी दिली आहे.
शहरातील संशयित स्वॅब तपासणीसाठी केईएम रुग्णालय आणि जे. जे. रुग्णालयात पाठवावे लागत आहेत. त्यामुळे उपचारास अधिक वेळ लागत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीमध्ये लवकरच प्रयोगशाळा तयार करण्यात येणार आहे.